मुंबई : पर्यटकांचा उत्साही प्रतिसाद पाहता माथेरानच्या मिनी ट्रेनचे डबे सहावरून आठ करण्याचा प्रस्ताव होता. रेल्वेच्या आरडीएसओने (रिसर्च स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन) सोमवारी आठ डब्यांची ट्रेन चालविण्यास मंजुरी दिली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर आठ डब्यांची मिनी ट्रेन पर्यटकांच्या सेवेत दाखल होईल.

सध्या माथेरानची मिनी ट्रेन सहा डब्यांची आहे. यात तीन द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी, कुटुंबीयांसाठी एक डबा आणि एका मालवाहतूक डब्याचा समावेश आहे.

प्रथम श्रेणीच्या डब्याची प्रवासी क्षमता २४ तर द्वितीय श्रेणीच्या डब्याची क्षमता ३० आहे. मध्य रेल्वेने मध्यंतरी आठ डब्यांच्या मिनी ट्रेनची चाचणी केली होती. त्यानंतर आठ डब्यांची ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव आरडीएसओकडे पाठविला होता. त्याला आता मंजुरी मिळाल्यानंतर सहा डब्यांच्या मिनी ट्रेनला एक प्रथम श्रेणी आणि एक द्वितीय श्रेणी डबा जोडण्याचा विचार मध्य रेल्वे करीत आहे. मे २०१६ मध्ये डबे घसरण्याच्या दोन दुर्घटना घडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला होता. संरक्षक भिंत, रूळदुरुस्ती कामे केल्यानंतर ही सेवा सुरू करण्यात आली होती.