मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कामकाज सुरू होऊन महिना होत नाही, तोच विद्यापीठातील ८ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. तर जवळपास ६० ते ७० कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे स्थायी कर्मचाऱ्यांसाठी ३ लाखांच्या विम्याची तरतूद करणाऱ्या विद्यापीठाचे बाधित अस्थायी कर्मचारी मात्र वाऱ्यावर आहेत.

विद्यापीठाने कामकाज सुरू होताच स्थायी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विम्याची सोय केली. त्यावेळी अस्थायी स्वरूपात काम करणाऱ्या १२०० कर्मचाऱ्यांनाही विमा द्यावा, अशी मागणी होती. परंतु ती अद्याप मान्य झालेली नाही. कामकाज सुरू होऊन महिना उलटला असतानाच ८ कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे समजते. परीक्षा व मूल्यमापन विभागातील वरिष्ठ लिपिक, शिपाई, फोर्टच्या विधी विभागातील वरिष्ठ लघु लेखिका, जे.बी.आय. एम. एस.चे हवालदार आणि लेखापाल, ग्रंथालय शिपाई, सेवा निवृत्ती लाभचे कनिष्ठ लिपिक आदी कर्मचारी बाधित झाले असून त्यांच्या सहवासात आलेले ६० ते ७० कर्मचारी सध्या विलगीकरणात आहेत. बाधित रुग्ण आढळलेल्या विभागातील कामकाज थांबवण्याबाबत विद्यापीठाने कोणतेही अधिकृत आदेश दिलेले नाहीत. परंतु विभागवार प्रत्येक वरिष्ठांनी आपापल्या कर्मचाऱ्यांना १९ जुलैपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. परिणामी विद्यापीठाचा बहुतांशी कारभार ठप्प आहे. अधिकृत सूचना न मिळाल्याने काही कर्मचारी कामावर पोहोचलेही. परंतु विभागांना टाळे असल्याने त्यांना घर गाठावे लागले. या ढिसाळ कारभाराबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

दुसरीकडे विद्यापीठातील अस्थायी कर्मचाऱ्यांमध्ये तुटपुंजे वेतन, वाढीव प्रवासखर्च यांबद्दल नाराजी आहे. त्यात करोना संसर्गामुळे वैद्यकीय खर्चाचा भार उचलावा लागत आहे. ‘आम्हाला अवघा आठ ते दहा हजार पगार मिळतो. त्यात कुटुंबाचे भागवणेही मुश्कील होते तर वैद्यकीय खर्च कसा परवडणार. आमच्या एका सहकाऱ्याचे वडीलही उपचार वेळेत न मिळाल्याने निधन पावले. त्यामुळे आरोग्य विमा ही गरज समजून विद्यापीठाने आम्हाला त्यात सामावून घ्यावे,’ अशी मागणी कर्मचाऱ्यांनी के ली आहे. तर ‘विम्याचा प्रश्न अनेकदा कुलगुरूंच्या निदर्शनास आणून देखील त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष के ले आहे,’ असे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तुळसकर यांनी सांगितले.

कर्ज काढून उपचार

कामकाज सुरू झाल्यानंतर कल्याण ते फोर्ट असा प्रवास स्वखर्चाने करत होतो. मध्येच माझी प्रकृती खालावली. त्या उपचारादरम्यान बरेच पैसे खर्च झाले. पुढे तातडीने करोना चाचणी करावी लागली. प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी करूनही नकार देण्यात आला. सध्या माझ्यामुळे कुटुंबातील तीन जण बाधित आहोत. उपचारांसाठी कर्ज काढावे लागले आहे, असे एका बाधित कर्मचाऱ्याने सांगितले.

१५ टक्के कर्मचाऱ्यांवर विद्यापीठातील कामकाज सुरू आहे. त्यामुळे काही कर्मचारी बाधित आढळून आल्यानंतरही कामकाज बंद ठेवणे शक्य नाही. परंतु ज्या विभागांमध्ये रुग्ण आढळले आहेत, त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. अस्थायी कर्मचाऱ्यांच्या विम्याची मागणी रास्त असली तरी नुकताच पदभार स्वीकारल्याने त्याबाबत म्प्रतिक्रिया देऊ शकत नाही.

– डॉ. विनोद पाटील, प्रभारी कुलसचिव