मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह आठ कार्यकर्त्यांना मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. या आठही जणांना प्रत्येकी १५ हजाराच्या जातमुचलक्यावर मुंबई जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दोन दिवसापूर्वीच या सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

संदीप देशपांडे आणि मनसेचे सात कार्यकर्ते मागील दोन दिवसांपासून भायखळ्याच्या आर्थर रोड तुरूंगामध्ये आहेत. काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह संतोष सरोदे, संतोष धुरी, दिवाकर पडवळ, अभय मालप, हरिश सोळंकी, योगेश चिले आणि विशाल कोकणे यांना अटक करण्यात आली होती.

गेल्या आठवड्यात (१ डिसेंबरला) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड झाली होती. काँग्रेसच्या आझाद मैदानाजवळील कार्यालयात घुसून मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या काचा फोडल्या होत्या. या हल्ल्याची जबाबदारी मनसेने स्वीकारली होती. तशा आशयाचे ट्विटही मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले होते. यानंतर या घटनेचे सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांनी संदीप देशपांडेंसह आठ जणांना अटक केली होती. फेरीवाल्यांवरुन काँग्रेस विरुद्ध मनसे असा संघर्ष सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही तोडफोड झाली होती.