News Flash

पश्चिम रेल्वेवर आठ नवीन स्थानके

विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पात समावेश

विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पात समावेश

विरारपल्याडच्या वाढत्या वस्तीसाठी पर्याय

मुंबईच्या उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढवणाऱ्या एमयूटीपी- ३ या योजनेतील विरार-डहाणू चौपदरीकरणाच्या प्रकल्पामुळे या पट्टय़ातील प्रवाशांना जादा फेऱ्या मिळणार आहेतच, पण त्याचबरोबर या पट्टय़ात आठ नवीन स्थानकेही या प्रकल्पामुळे तयार होणार आहेत. ६४ किलोमीटरच्या या पट्टय़ात गेल्या काही वर्षांमध्ये नवनवीन गृहनिर्माण प्रकल्प, औद्योगिक प्रकल्प झाल्याने येथील प्रवासी वहनक्षमता वाढली आहे. त्याचा विचार करून सध्या फक्त नऊ स्थानके असलेल्या विरार-डहाणू मार्गावर आणखी आठ स्थानकांची भर पडणार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम रेल्वेवर बोरिवलीच्या पल्याडच्या प्रवासी संख्येत कमालीची वाढ झाली आहे. त्यानंतर पश्चिम रेल्वेने बोरिवली ते विरार यांदरम्यानच्या सेवा वाढवल्या. आताही पश्चिम रेल्वेने नव्या वेळापत्रकात या सेवांमध्ये भर टाकली आहे. पण विरार ते डहाणू या मार्गावरील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन या मार्गावरील फेऱ्यांमध्येही वाढ करावी लागणार आहे. त्यासाठी या मार्गाचे चौपदरीकरण करण्याची गरज आहे. ही गोष्ट लक्षात घेऊनच एमयूटीपी- ३ या योजनेत विरार-डहाणू यादरम्यान चौपदरीकरणाचा प्रकल्प प्रस्तावित केला होता. या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर आता या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.

सध्या विरार-डहाणू या ६४ किलोमीटरच्या पट्टय़ात विरार, वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोली, बोईसर, वाणगाव आणि डहाणू रोड एवढीच स्थानके आहेत. या स्थानकांदरम्यानचे अंतर किमान आठ किलोमीटर तर कमाल १२ किलोमीटर एवढे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या स्थानकांच्या आसपासही नवनवीन गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले असून अनेक उद्योगधंदे विकसित झाले आहेत. मुंबईतील जागेची कमतरता लक्षात घेता स्वस्त जागेसाठी अनेक जण विरारपल्याड जाऊ लागले आहेत. परिणामी या पट्टय़ातील प्रवासी संख्याही गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. ही वाढ प्रामुख्याने सफाळे, बोईसर आणि पालघर या स्थानकांवर जास्त दिसते.

नेमका हाच विचार करून विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पात आठ नवीन स्थानके बांधली जाणार आहेत. ही स्थानके वैतरणा-सफाळे (२), सफाळे-केळवे (१), केळवे-पालघर (१), पालघर-उमरोली (१), उमरोली-बोईसर (१), बोईसर-वाणगाव (१), वाणगाव-डहाणू रोड (१) या सध्याच्या स्थानकांदरम्यान बांधली जाणार आहेत. त्यामुळे या मार्गावर सरासरी दर चार किलोमीटरवर एक स्थानक असेल, असे एमआरव्हीसीच्या अहवालात म्हटले आहे.

नवीन स्थानके

  • वाधवी, सारतोडी, माकुन्सर, चिंतुपाडा, खराळे रोड, पांचाली, वंजारवाडा, बीएसईएस कॉलनी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 2:00 am

Web Title: 8 new railway stations at western railway
Next Stories
1 सातारा सैनिकी शाळेचे शुल्क कमी होणार
2 कुटुंबनियोजन योजनेचीच ‘नसबंदी’!
3 युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीला अपघात, कोणीही जखमी नाही
Just Now!
X