News Flash

शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजारांची मदत

फळबागांच्या नुकसानीपोटी हेक्टरी १८ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी केली.

(संग्रहित छायाचित्र)

फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार;  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्कही माफ

राज्यात अवकाळी पावसामुळे शेती उद्ध्वस्त झालेल्या नैराश्यग्रस्त बळीराजाला दिलासा देण्यासाठी खरिपाच्या पिकांसाठी हेक्टरी आठ हजार रुपये, तर फळबागांच्या नुकसानीपोटी हेक्टरी १८ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी केली.

दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत दिली जाणार असून बाधित शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क तसेच शेतसाराही माफ करण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. ही मदत तुटपुंजी आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याची टीका राजकीय पक्ष आणि शेतकऱ्यांच्या संघटनांनी केली.  राज्यपालांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करून त्यांच्याशी नुकसान आणि मदतीबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर नुकसान झालेल्या खरीप पिकांसाठी प्रति हेक्टरी आठ हजार रुपये, तर फळबागायती आणि बारमाही पिकांसाठी प्रति हेक्टर १८ हजार रुपयांची मदत जाहीर केली. याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा, महाविद्यालयातील परीक्षा शुल्क माफ करण्याचा तसेच संकटग्रस्त क्षेत्रातील शेतसारा माफ करण्याचा निर्णयही राज्यपाल कोश्यारी यांनी जाहीर केला. मदतीचे वितरण तातडीने करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

गुंठय़ाला ८० रुपये!

राज्यपालांनी शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार म्हणजे गुंठय़ाला केवळ ८० रुपये, तर बागायती पिकांना गुंठय़ाला केवळ १८० रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्यपालांचा हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याची टीका अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिणीस आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. अजित नवले यांनी केली आहे. एकरी किमान २५ हजार रुपयांची सरसकट प्राथमिक मदत शेतकऱ्यांना देण्याची मागणीही नवले यांनी केली.

काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत जाहीर केली जाईल, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर केले.  राज्यपालांनी जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून त्यातून पिकांवर झालेला खर्चसुद्धा निघणार नाही. सुलतानी जाचाने छळण्याचा हा प्रकार आहे. केंद्र सरकारने राज्यात लक्ष घालणे गरजेचे आहे. सरकारला शेतकऱ्यांचे दु:ख या जन्मात तरी कळणार आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केला.

९३.८९ लाख हेक्टर शेती उद्ध्वस्त

अवकाळी पावसामुळे ३४ जिल्ह्य़ांच्या ३२५ तालुक्यांतील ९३.८९ लाख हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले. प्रामुख्याने भात, कापूस, सोयाबीन, तूर ही पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली असून फळबागांनाही मोठा फटका बसला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 1:33 am

Web Title: 8 thousand rupees per hectare help for affected farmers abn 97
Next Stories
1 सरकार स्थापण्याची शिवसेनेला घाई
2 सुसाट वाहनांच्या वेगाला उद्यापासून लगाम
3 अदानी, रिलायन्सही टोलवसुलीत!
Just Now!
X