पालिकेच्या सुधार समितीच्या बैठकीत आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
वीरमाता जिजाबाई उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या (राणीबाग) विस्तारीकरणासाठी लगतचाच एक भूखंड तब्बल ८० कोटी रुपयांचा भरुदड सहन करून खरेदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला हा भूखंड खरेदी करण्यासाठी सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीच उत्सुक असल्याचे समजते. सुधार समितीच्या गुरुवारच्या बैठकीत भूखंड खरेदीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
सध्या नूतनीकरणाचे काम सुरू असलेल्या राणीच्या बागेचे विस्तारीकरणही विचाराधीन आहे. त्यासाठी राणीच्या बागेलगत असेलेली सात एकर जागा मफतलाल कंपनीकडून ताब्यात घेण्यात आली आहे. या भूखंडाच्या शेजारचा ७,७२२.४७ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला भूखंड महेंद्र राजीव छेडा यांच्या मालकीचा आहे. या भूखंडावर ७५ अनिवासी गाळे, शीतगृह आदी आहे. हा भूखंड राणीच्या बागेच्या विस्तारीकरणासाठी उपयोगी पडू शकेल असे निमित्त पुढे करून पालिकेवर खरेदी सूचना बजावण्यात आली आहे.
या भूखंड खरेदीसाठी मालकाला ४९ कोटी ८१ लाख रुपये देण्यात येणार आहेत. तर गाळेधारकांची व्यवस्था पालिकेलाच करावी लागणार असून त्यासाठी २८ कोटी ८९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पालिकेच्या तिजोरीतील असे एकूण ८० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. केवळ राणीच्या बागेचे विस्तारीकरण डोळ्यासमोर ठेवून पालिकेने हा भूखंड खरेदीचा निर्णय घेतला असून त्याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या गुरुवारच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. त्यास शिवसेना-भाजप युतीही अनुकूल आहे. त्यामुळे करदात्या मुंबईकरांनी पालिकेच्या तिजोरीत जमा केलेले तब्बल ८० कोटी रुपये खर्च करून हा भूखंड ताब्यात घेण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. सुधार समितीमध्ये याबाबतच्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर तो पालिका सभागृहात सादर करण्यात येणार आहे. सभागृहाने मंजुरी दिल्यानंतर भूखंड खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.