राज्यात १२,७७६ ग्रामपंचायतींसाठी शुक्र वारी सरासरी ८० टक्क्य़ांपर्यंत मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मतमोजणी सोमवारी होईल.
राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्र म जाहीर करण्यात आला होता. यापैकी १२,७७६ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले. उर्वरित ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध पार पडल्या. दुपारी साडेतीनपर्यंत सरासरी ६६ टक्के मतदान झाले होते, असे राज्य निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शेवटच्या दोन तासांत चांगले मतदान झाल्याचा अंदाज आहे. यामुळे ८० ते ८५ टक्के मतदान होईल, अशी शक्यता वर्तविली जाते. काही ठिकाणी हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या.
पश्चिम महाराष्ट्रात मतदारांच्या रांगा..
सातारा जिल्ह्य़ातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८० टक्के मतदान झाले. मतदारांच्या सकाळपासूनच मोठमोठय़ा रांगा लागल्या होत्या. सांगलीतही १४२ ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी मतदारांमध्ये मोठा उत्साह होता. मतदाराला केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनांचा सर्रासपणे वापर केल्याचे सर्वत्र दिसून आले.
कोल्हापूर जिल्ह्य़ातील ४७ ग्रामपंचायतींची निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली आहे. उर्वरित ३८७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी चुरशीने मतदान झाले. काही गावांमध्ये संघर्षांचे, तर काही ठिकाणी मतदानाच्या दिवशी उमेदवारांमधील एकीचे चित्र होते.
सोलापूरमध्ये ५८९ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. या निवडणुकीत करमाळा, बार्शी, पंढरपूर, माळशिरस, अक्कलकोट, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर आदी सर्वच तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. जिल्ह्य़ातील अकलूज ग्रामपंचायतीची निवडणूक ही मोहिते पाटील घराण्यातच होत असल्याने या लढतीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
नगर जिल्ह्य़ातील ७०५ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित झाल्याने तब्बल ३० वर्षांनंतर मतदान झाले. पोलीस अधिकाऱ्याने मुख्याध्यापकास मतदान केंद्राच्या आवारात मारहाण केल्याने डोंगरगण (ता. नगर) येथील मतदारांनी सुमारे दोन तास मतदानावर बहिष्कार टाकला होता. अधिकाऱ्याने माफी मागितल्यानंतर बहिष्कार मागे घेण्यात आला. सुपे (ता. पारनेर) मतदान केंद्रात नारळ फोडल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मराठवाडय़ात उत्साह..
मराठवाडय़ातील तीन हजार ७४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. ३८८ ग्रामपंचायतीमधील सदस्य बिनविरोध निवडून आले. गावागावात मतदानाचा उत्साह होता. वयोवृद्ध व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी कसरत सुरू होती. स्वतंत्र वाहने करुन गावातील मतदार गावात आणला गेला. हिंगोली, उस्मानाबाद, जालना, परभणी, नांदेड तसेच औरंगाबादमध्ये सुमारे ७५ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.
विदर्भातही मतदारांत चैतन्य..
नागपूर: विदर्भात शुक्रवारी झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ासह इतरही जिल्ह्य़ातही उत्साहात मतदान झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार, अंदाजे ६५ ते ७० टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. नागपूर जिल्ह्य़ात ६५ टक्के, चंद्रपूर जिल्ह्य़ात ६४ टक्के, यवतमाळ ६२ टक्के, वर्धा ६१ टक्के, भंडारा ७१ टक्के, गडचिरोली ७१ टक्के, वाशीम ६१ टक्के, अमरावती ६० टक्के, अकोला ५८ टक्के आणि बुलढाणा जिल्ह्य़ात ६३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली होती.
प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती – १२,७७६
एकूण प्रभाग – ४६,९२१
एकूण जागा – १ लाख २५ हजार, ७०९
रिंगणातील उमेदवार – २ लाख १५ हजार
बिनविरोध निवड झालेले उमेदवार – २६,७१८
उमेदवारांच्या रांगा!
निवडणुका म्हटले, की सर्वत्र मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र नेहमी दिसते. परंतु शुक्रवारी राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनेक गावांमध्ये मतदारराजाला मतदानाची विनंती करत अशा उमेदवारांच्याही रांगा लागल्याचे पाहण्यास मिळाले. कुठे एका विशिष्ठ आघाडीचे तर कुठे गटतट विसरत सर्वच उमेदवारांची अशी एकत्र रांग पाहण्यास मिळत होती. कोल्हापूर जिल्ह्य़ातील खुपिरे गावातील हे असेच दृश्य.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 16, 2021 12:23 am