संदीप आचार्य 
मुंबईत करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकट्या मुंबईत सुमारे १५ हजार करोनाबाधितांची कालपर्यंत नोंद झाली आहे. ही परिस्थिती गंभीर असून करोना रुग्णांच्या उपचारासाठी आता खासगी व महापालिका रुग्णालयांतील ८० टक्के खाटा राखीव ठेवल्या पाहिजे अशी भूमिका मुंबईतील करोना रुग्णांसाठी नेमलेल्या ‘विशेष कृती दला’ने राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे मांडली आहे.

मुंबईत सुमारे साठ लाख लोक झोपडपट्टी किंवा दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये राहात असून करोना चाचणी पासून ते उपचार करण्याबाबतचे नवे निकष, स्थलांतरितांना त्यांच्या राज्यात पाठविण्याचा निर्णय तसेच घरपोच मद्य देण्यापासून ते लॉकडाउनची प्रभावी अमलबजावणी करण्यात पुरेसे यश न येणे याचा विचार करता आगामी काळात रुग्णांची संख्या वाढण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

मुंबईत करोनाचे वाढणारे रुग्ण व एकूण मृत्यू याचा आढावा सोमवारी मुंबईसाठी नेमलेल्या कृतीदलाच्या बैठकीत घेण्यात आला. यात पालिका रुग्णालयातील करोना साठी राखीव असलेल्या खाटा तसेच भविष्यातील वाढीव खाटा आणि खासगी रुग्णालयातील खाटांचाही आढावा घेण्यात आला. “खासगी रुग्णालयांकडून पालिकेला पुरेसे सहकार्य मिळत नसल्याचे सदस्यांचे म्हणणे असून आगामी सहा आठवड्यांसाठी पालिका रुग्णालये व खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा करोना रुग्णांसाठी राखीव ठेवल्या पाहिजे ही भूमिका कृतीसमितीने मुख्य सचिवांना कळवली आहे ” असे या समितीचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी सांगितले.

याशिवाय सरकारने आता तरी पीपीइ किट व एन ९५ मास्कचे दर नियंत्रित केले पाहिजे, असेही डॉ. संजय ओक यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. पीपइ किटचा दर हा पाचशे ते सहाशे रुपयांपेक्षा जास्त असताच कामा नये असेही ते म्हणाले. “करोनावरील उपचारांसाठी चार औषधं वापरल्यास त्याचा रुग्णांना निश्चित फायदा होईल. ही औषधे सरकारने मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावी अशी शिफारस आम्ही केली आहे” असे डॉ. ओक म्हणाले. करोनावरील उपचारासाठी जी औषधे वा उपकरणे यांची खरेदी केली जाते त्यावरील जीएसटी माफ केला पाहिजे अशी शिफारसही समितीने केली आहे.

काही खासगी रुग्णालये रुग्णांकडून लाखो रुपये उपचारापोटी उकळत असल्याच्या तक्रारी आहेत. करोनाच्या लढाईत खासगी रुग्णालयांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे सांगून डॉ. संजय ओक म्हणाले, खाजगी रुग्णालयांनी रुग्णसेवेचा ‘व्यवसाय’ करू नये. एकूणच मुंबईतील वाढते रुग्ण व त्यासाठी अतिदक्षता विभागात लागणाऱ्या खाटांचा विचार करून खासगी व पालिका या दोन्ही रुग्णालयातील ८० टक्के खाटा या करोना रुग्णांसाठी राखीव ठेवल्या पाहिजेत.