तक्रार आली तरच कारवाईची म्हाडाची भूमिका

गिरण्यांच्या भूखंडावर उभ्या राहिलेल्या इमारतींतून दक्षिण मुंबईत घर मिळाल्यानंतरही ८० टक्के गिरणी कामगारांनी घरांची विक्री केल्याचा अंदाज आहे. ही घरे दहा वर्षे विकता येत नाही, याची कल्पना असतानाही मुखत्यारपत्राद्वारे वा सदनिका भाडय़ाने दिल्याचे दाखवून ही घरे विकली गेल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या प्रकरणी तक्रार आली तरच कारवाई केली जाईल, अशी भूमिका म्हाडाने घेतली आहे. या प्रकरणी तपासणी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गिरणी कामगार कृती समितीने केली आहे.

२०१२ पासून आतापर्यंत साडेनऊ हजार घरांचे वितरण गिरणी कामगारांना करण्यात आले आहे. २२५ चौरस फुटांचे हे घर गिरणी कामगारांना फक्त ११ लाख रुपयांत उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रभादेवी, वरळी या परिसरात असलेल्या या घरांची विक्री ४० ते ६० लाख रुपयांना करण्यात आली आहे. ही घरे दहा वर्षांपर्यंत विकता येत नसल्यामुळे मुखत्यारपत्र करून या घरांची विक्री करण्यात आली आहे. या प्रकरणी म्हाडाने तपासणी केल्यास वस्तुस्थिती बाहेर येईल, असा विश्वास गिरणी कामगार कृती समितीच्या दत्ता इस्वलकर यांनी व्यक्त केला आहे. याबाबत झालेल्या एका बैठकीत म्हाडाला तशा सूचनाही करण्यात आल्या होत्या. अनेक गरजू गिरणी कामगारांना घरे मिळालेली नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गिरण्यांच्या भूखंडावर आतापर्यंत ९६४८ घरांसाठी सोडत काढण्यात आली आहे. गिरणी कामगारांसाठी आणखी सहा ते सात हजार घरे बांधण्याचे काम सुरू आहे. सुरुवातीला सोडत काढण्यात आली तेव्हा तब्बल १२२८ प्रकरणांमध्ये घोटाळा असल्याचे आढळून आले होते. काही घरे एकाच  कुटुंबात व्यक्तींना वितरित झाल्याचे स्पष्ट झाले होते. उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए. एस. अग्यार यांना तपासणी समितीचे प्रमुख नेमल्यानंतर झालेल्या चौकशीत हे उघड झाले होते. भविष्यात सोडत काढताना कोणती काळजी घेण्यात यावी, याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. याबाबत मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांच्याकडे विचारणा केली असता, गिरणी कामगारांनी त्यांना वितरित झालेली घरे विकली असली तरी त्याचा अधिकृत अहवाल उपलब्ध नाही, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी म्हाडाकडून तपासणी केली जाणार का, असे विचारता तूर्तास तरी तसा विचार नाही. मात्र विशिष्ट तक्रार आली तर गुन्हा दाखल केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गिरणी कामगारांना वितरित झालेली घरे भाडय़ाने देण्याची मुभा देण्यात आली आहे. किती घरांची विक्री झाली आहे याची माहिती नाही. मात्र विशिष्ट तक्रार आल्यानंतर कारवाई नक्कीच केली जाईल. प्रसंगी गुन्हाही दाखल केला जाईल   – सुभाष लाखे, मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण मंडळ.