पहिल्या फेरीत मुंबई महानगरातील ६१ हजार विद्यार्थ्यांचा अकरावीत प्रवेश

मुंबई : अकरावी प्रवेशाच्या पहिल्याच फेरीत शहर आणि उपनगरांतील नामांकित महाविद्यालयांमधील ७० ते ८० टक्के जागांवरील प्रवेश निश्चित झाले आहेत. काही महाविद्यालयांमध्ये तर प्रवेश क्षमतेपैकी दुसऱ्या फेरीसाठी २०-२५ जागा शिल्लक आहेत.

मुंबई आणि महानगरातील अकरावी प्रवेशाची पहिली फेरी मंगळवारी पूर्ण झाली. नावाजलेल्या महाविद्यालयांमधील बहुतेक जागांवरील प्रवेश पहिल्या फेरीतच पूर्ण झाले आहेत. शहराबरोबरच उपनगरामधील नावाजलेल्या महाविद्यालयांमधील प्रवेश झाले आहेत. यातील काही महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ५०० ते अगदी १५०० पर्यंत आहे. मात्र, दुसऱ्या फेरीसाठी त्यातील ५०  जागाही शिल्लक राहिलेल्या नाहीत. केसी, रुईया, पोद्दार, रुपारेल, साठय़े, डहाणूकर, मिठीबाई, झेविअर्स, वझे-केळकर, हिंदुजा, पाटकर यांसह अनेक महाविद्यालयांमध्ये पाच ते दहा टक्के जागा शिल्लक राहिल्या आहेत. नवी मुंबई, उपनगरांमधील काही नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयांमधील ६०  टक्क्यांवरील जागाही भरल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्या फेरीतही या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रता गुण (कट ऑफ) फारसे कमी होणार नसल्याचे दिसत आहे.

इंटिग्रेटेड महाविद्यालयांना उदंड प्रतिसाद

शिकवण्यांबरोबर संधान बांधलेली किंवा शिकवणीचालकांनीच सुरू केलेली महाविद्यालये टीकेचे धनी ठरत आहेत. भरमसाट शुल्क आणि शिक्षण विभागाच्या नियमांना डावलून चालणाऱ्या या महाविद्यालयांवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न शिक्षण विभागही करत असतो. इंटिग्रेटेड महाविद्यालयांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले जाते. असे असले तरीही विद्यार्थी आणि पालकांचा ओढा याच महाविद्यालयांकडे असल्याचे समोर आले आहे. इंटिग्रेटेड महाविद्यालयांमधील विज्ञान शाखेच्या जागा तर जवळपास भरल्या आहेत. काही महाविद्यालयांमध्ये एखाद दुसरी जागा दुसऱ्या फेरीसाठी शिल्लक राहिली आहे.

पहिल्या फेरीची स्थिती

प्रवेश अर्ज : १ लाख ८५ हजार ३१८

महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी : १ लाख ३४ हजार ४६७

निश्चित झालेले प्रवेश : ६१ हजार ६४५

प्रवेश नाकारलेले विद्यार्थी : ३७३

प्रवेश न घेतलेले विद्यार्थी : ७२ हजार ३६१

दुसरी फेरी कशी असेल?

दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या महाविद्यालयांच्या प्राधान्यक्रमात बदल करता येईल. जे विद्यार्थी प्रधान्यक्रम नव्याने देणार नाहीत त्यांचा पहिल्या फेरीचा प्राधान्यक्रम गृहीत धरण्यात येईल. गुरुवारी (१८ जुलै) आणि शुक्रवारी (१९ जुलै) विद्यार्थी प्राधान्यक्रमात बदल करू शकतील. महाविद्यालयाचे कट ऑफ गुण आणि रिक्त जागा लक्षात घेऊन दुसऱ्या फेरीतील प्राधान्यक्रम निश्चित करावेत, असे आवाहन प्रवेश समितीने केले आहे. पहिल्या फेरीनंतर महाविद्यालयातील रिक्त जागांचे तपशील https://mumbai.11thadmission.net/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. दुसरी प्रवेश यादी २२ जुलैला जाहीर होणार आहे.