करोनातून बरे झालेल्या ८० वर्षीय दाम्पत्याचे मनोगत

शैलजा तिवले, लोकसत्ता

98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक
accused in child sexual abuse case arrest after three years
बाललैंगिक अत्याचारप्रकरणी तीन वर्षांनंतर आरोपीस अटक
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

मुंबई:  ‘ऐंशीव्या वर्षांत पदार्पण केले तरी आजवर कधीच रुग्णालयात राहण्याची वेळ माझ्यावर आली नाही की कधी साधी सुई टोचून घेतली नाही. परंतु करोनाने मला हे सारे दाखविले. रुग्णालयात असताना आपण पुन्हा घरी जाऊ ना अशी शंकेची पाल मनात चुकचुकत होती. सुरुवातीचे काही दिवस नैराश्यात गेले. परंतु खचलेल्या मनाला पुन्हा उभारी दिली आणि २०२१ मध्ये नव्या जोमाने जगण्याचा निश्चय करत आम्ही दोघेही सुखरूप घरी परतलो..’ मुलुंडच्या ८० वर्षीय दाम्पत्याची जगण्याची जिद्द पाहून कवी अप्पा ठाकूर यांची ‘आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे..’ ही गझल आठवल्याशिवाय राहत नाही.

मुलुंडचे रहिवासी असलेले सुब्रह्मण्यम आणि त्यांची पत्नी शांता नटराजन यांना २२ डिसेंबरला करोना झाल्याचे निदान झाले. तातडीने त्यांना जवळील फोर्टिस रुग्णालयात दाखल केले. ‘मला मधुमेह आहे. निदान झाल्यावर थोडा घाबरलो होतो. आम्ही दोघेही एकटे होतो. माझी दोन्ही मुले अमेरिका आणि ब्रिटनमध्ये असतात. त्यांची भेट होईल ना असे वाटायचे. दिवसातून तीन ते चार वेळा मी त्यांच्याशी बोलत होतो’, हे सांगताना नटराजन यांना डोळ्यातून अश्रू आवरता आले नाहीत.

‘घाबरून येथून सुटका नाही, तेव्हा लढणे हाच एक मार्ग आहे, हे स्पष्ट दिसत होते. माझी पत्नी आणि मी एकाच खोलीत उपचार घेत होतो. दोघांनाही अतिशय थकवा, वास नाही, तोंडाला चव नाही, अशी लक्षणे होती. मन रमविण्याचा प्रयत्न करत होतो. क्रीडाप्रेमी असल्याने सामने पाहायचो. पत्नी मालिका पाहायची. संध्याकाळी तिथेच चालायचो, असे आम्हीच आम्हाला खंबीरपणे पाठिंबा देत जसे दोघे एकत्र गेलो तसेच दोघे एकत्र नवीन वर्षांची नवी स्वप्ने घेऊन ३० डिसेंबरला घरी परतलो’, असा अनुभव नटराजन यांनी कथन के ला.

जगण्याच्या जिद्दीमुळे भयंकर आजारावर यशस्वीपणे मात करणारे यांच्यासारखे ६० वर्षीय अनिरुद्ध नॅन्सी हेदेखील आहेत. गेल्या दहा वर्षांपासून हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या नॅन्सी यांच्यावर नुकतीच एका खासगी रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. ‘करोनाकाळात प्रत्यारोपणात अनेक धोके होते. परंतु रुग्णालयाच्या प्रयत्नाने सर्व व्यवस्थितपणे पार पडले. नवीन आयुष्यातील हे नवीन वर्ष अनेक आशा घेऊन आले आहे. नक्कीच अजून आयुष्यात खूप करायचे आहे.’ असे अनिरुद्ध सांगत असताना ठाकूर यांच्या त्याच गझलेतील ‘जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे.’ ही ओळ डोळ्यांसमोर तरळते.