मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) तब्बल ८०० हून अधिक विद्यार्थ्यांची अवघ्या १८ दिवसांत कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरी पक्की झाली असून, या वर्षी सॅमसंगने तब्बल ८० लाख रुपयांच्या वेतनाचे ‘ऑफर लेटर’ एका विद्यार्थ्यांच्या हातात सोपवून आघाडी घेतली आहे. त्या खालोखाल रॉकेट फ्युएल, फेसबुक आदींनीही लाखो रुपयांचे पॅकेज दिल्याची चर्चा असून, हे गुणवंत विद्यार्थी सध्या ‘निकल पडी’च्या हिंदोळ्यावर झुलत आहेत.
या वर्षी पगाराबरोबरच गलेलठ्ठ बोनस आणि स्टॉकचे पर्याय देऊन हुशार विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकडे कंपन्यांचा कल होता. स्टॉकचे पर्याय तर एका वर्षांच्या एकूण वार्षिक वेतनाइतके असल्याने या नोकऱ्यांची भुरळ विद्यार्थ्यांना न पडेल तरच नवल. त्यामुळे, तब्बल ८२८ विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटच्या पहिल्या टप्प्यात नोकऱ्या स्वीकारणे पसंत केले आहे.
जागतिक स्तरावर आर्थिक अनिश्चितता असतानाही तब्बल २४० कंपन्या प्लेसमेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. यात आयआयटीच्या ७० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या निश्चित झाल्या आहेत. कंपन्यांनी तब्बल ९०० विद्यार्थ्यांच्या हातात ‘ऑफर लेटर’ ठेवले आहे. आयआयटीतून बीटेक, डय़ुएल डिग्री, एमटेक, एमफील, पीएचडी आदी अभ्यासक्रमांतून दर वर्षी तब्बल पंधराशे विद्यार्थी उत्तीर्ण होतात.
व्यवस्थापन सल्लागार व वित्त क्षेत्रातील १८ कंपन्यांनी तब्बल १५० विद्यार्थ्यांना नोकरी देऊ केली आहे. यापैकी बहुतांश कंपन्या या जागतिक स्तरावरील असून, उमेदवारांच्या निवडीबाबत त्या फारच काटेकोर आणि चोंखदळ असतात. आयआयटीच्या तब्बल ८४ विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नोकऱ्या देऊ केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात मॅनेजमेंट कन्सल्टिंग, अभियांत्रिकी, आयटी, फायनान्स आदी क्षेत्रांतील कंपन्यांचा प्रभाव कॅम्पस प्लेसमेंटवर राहिला.
पहिल्या टप्प्यातच भरारी..
पहिल्या टप्प्यात बी.टेक.च्या ४१७पैकी २९९ जणांच्या नोकऱ्या निश्चित झाल्या आहेत. डय़ुएल पदवीच्या २३९ पैकी १८६, एमटेकच्या ५३२ पैकी ३३२ आणि एमएस्सीच्या १८पैकी ११ विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात ‘निकल पडी’च्या भावनेचा आनंद घेता आला. मुलाखतीचा दुसरा टप्पा जूनपर्यंत पार पडेल. तेव्हा यात तब्बल १०० कंपन्या सहभागी होणार असून, आणखी काही विद्यार्थ्यांच्या हातात ऑफर लेटर पडण्याची शक्यता आहे.