वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून राज्यातील ८ ते १० हजार जागांसाठी साधारण ८० हजार विद्यार्थी पात्र ठरले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेश पात्रता गुण साधारण ५० गुणांनी वाढले आहेत. या परीक्षेत ओडिशा येथील शोएब आफताब आणि दिल्ली येथील आकांक्षा सिंग हे पैकीच्यापैकी गुण मिळवून (७२० गुण) देशात पहिले आले आहेत. राज्यात आशीष झांटय़े  पहिला आला आहे.

राष्ट्रीय परीक्षा कक्षाने यंदा १३ सप्टेंबर रोजी नीट घेतली होती, तर या परीक्षेला उपस्थित राहू न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा १४ ऑक्टोबर रोजी झाली. या परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या आशीष झांटय़े (७१० गुण) हा राष्ट्रीय गुणवत्ता यादीत १९ व्या स्थानावर आहे. या परीक्षेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पात्र ठरलेल्या म्हणजे पन्नास पर्सेटाइलपेक्षा अधिक श्रेयांक असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. मात्र, वाढलेल्या गुणांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत पात्रता गुणांमध्ये (कट ऑफ) ५ ते १५ गुणांची वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवेशाची चुरस अधिकच वाढण्याची शक्यता आहे.

देशात यंदा १५ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १३ लाख ६६ हजार ९४५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली असून त्यातील ७ लाख ७१ हजार ५०० विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

एका जागेसाठी दहा विद्यार्थी

राज्यातील २ लाख २७ हजार ६५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १ लाख ९५ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील ७९ हजार ९७४ विद्यार्थी वैद्यकीय, दंतवैद्यकीय, वैद्यकपूरक, पशूवैद्यकीय आदी अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. यंदा वैद्यकीय (एमबीबीएस) आणि दंतवैद्यकीय (बीडीएस) अभ्यासक्रमाच्या राज्यात शासकीय, खासगी महाविद्यालये आणि अभिमत विद्यापीठांतील मिळून साधारण ८ ते १० हजार जागा आहेत. त्यानुसार एका जागेसाठी जवळपास १० विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. गेल्या वर्षी राज्यात ८१ हजार १७१ विद्यार्थी पात्र ठरले होते. मात्र तरीही गुण वाढल्यामुळे यंदा राज्याच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये ४० ते ५० गुणांचा फरक पडू शकतो असे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले आहे.

संकेतस्थळ ठप्प

‘नीट’चा निकाल नेमका किती वाजता जाहीर होणार हे कक्षाने जाहीर केले नसले तरी दरवर्षीच्या शिरस्त्यानुसार तो दुपारी जाहीर होणे अपेक्षित होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी दुपारपासून संकेतस्थळ पाहण्यास सुरुवात केली. मात्र, निकाल जाहीर झाल्याचे दिसत असले तरी संकेतस्थळ सुरू होण्यास तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेकांना शुक्रवारी निकाल पाहता आला नाही.

पहिल्या ५० विद्यार्थ्यांमध्ये राज्यातील विद्यार्थी

* आशीष झांटय़े – ७१० (९९.९९ पर्सेटाईल)

* तेजोमय वैद्य  – ७०५ (९९.९९ पर्सेटाइल )

* पार्थ कदम – ७०५ (९९.९९ पर्सेंटाइल )

* अभय चिल्लार्गे – ७०५ (९९.९९ पर्सेंटाइल )

पात्रता गुण

संवर्गनिहाय पात्रता गुणांमध्ये यंदा गेल्या वर्षीच्या तुलनात्मक वाढ झाली आहे. गेल्या वर्षी खुल्या गटासाठी ७०१ ते १३४ असलेले पात्रता गुण यंदा ७२० ते १४७ झाले आहेत. ओबीसीसाठी गेल्या वर्षी १३३ ते १०७ असलेले गुण यंदा १४६ ते ११३ झाले आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संवर्गासाठी (एससी-एसटी) गेल्या वर्षी १३३ ते १०७ असलेले गुण यंदा १४६ ते ११३ झाले आहेत. तर आर्थिकदृष्टय़ा मागास गटासाठी (ईडब्ल्यूएस) गेल्या वर्षी १३३ ते १२० असलेले गुण यंदा १४६ ते १२९ झाले आहेत.

मराठीतून परीक्षा देणारे विद्यार्थी घटले

देशभरातील विद्यार्थ्यांना नीटसाठी विविध भाषांचे पर्याय असतात. त्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून, त्या खालोखाल हिंदीतून परीक्षा दिली आहे. प्रादेशिक भाषांतून १ लाख ३४ हजार ५५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात मराठी माध्यमातून नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत घटला आहे. गेल्या वर्षी ३१ हजार २३९ विद्यार्थ्यांनी (२.६ टक्के) मराठी माध्यमातून परीक्षा दिली होती. तर यंदा त्यात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. यंदा केवळ ६ हजार २५८ विद्यार्थ्यांनी (०.३९ टक्के) विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमाला पसंती दिली.