मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण संख्या आणि मृतांची संख्या कमी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी ८०१ नवे रुग्ण आणि २३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

मुंबईतील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा आटोक्यात येऊ  लागला आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १३९ दिवसांवर गेला आहे. मुंबईतील सर्व २४ विभागातील रुग्ण दुपटीचा कालावधी १०० दिवसांच्या पुढे गेला आहे.

परळ, शिवडीमध्ये हा कालावधी सर्वात जास्त म्हणजेच २९६ दिवस अर्थात १० महिने इतका जास्त आहे. तर सर्वात कमी कालावधी दहिसर विभागाचा असून तो १०५ दिवसांचा आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर देखील अध्र्या टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. मंगळवारी ८०१ नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या २,५२,८८८ वर गेली आहे. तर १०४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २,२२,५०१ रुग्ण म्हणजेच ८८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या १९,२९० रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईत आतापर्यंत १४ लाख ६८ हजाराहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारी २३ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात २१ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये १६ पुरुष व ७ महिला होत्या.