27 October 2020

News Flash

मुंबईत ८१ टक्के करोनामुक्त

२४ तासांत १६२८ नवे रुग्ण, ४७ मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईत सप्टेंबरपासून वाढलेली करोनारुग्णांची संख्या हळूहळू नियंत्रणात येऊ लागली आहे. रुग्णवाढीचा दरही १.१६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधीही पुन्हा ६० दिवसांपर्यंत वाढला आहे. विशेष म्हणजे मंगळवारी १,६२८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून साधारण तितकेच म्हणजेच १,६६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे करोनामुक्त रुग्णांची संख्या ८१ टक्के झाली आहे.

मुंबईतील करोनाची दुसरी लाट पुन्हा एकदा नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठवडय़ातील रुग्णसंख्येवरून रुग्णवाढीचा दर कमी झाला आहे. रोज दोन हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत असताना हा आकडा आता दीड हजारांपर्यंत आला आहे. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या १ लाख ८७ हजारांच्या पुढे असली तरी १ लाख ५२ हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्याही बऱ्यापैकी घटली असून सध्या २६,६४४ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी सुमारे १,३०० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. मंगळवारी ४७ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ३७ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये ३१ पुरुष व १६ महिला होत्या. ३२ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते.

दहा हजार इमारती प्रतिबंधित

मुंबईतील तब्बल १०,०६५ इमारती प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. प्रतिबंधित इमारतींबाबत पालिकेने नुकतेच नवीन धोरण अवलंबले आहे. त्यानुसार एखाद्या इमारतीत दहा रुग्ण असल्यास किंवा दोनपेक्षा जास्त मजल्यांवर रुग्ण असल्यास ती संपूर्ण इमारत प्रतिबंधित करण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर रुग्णांची नोंद होत असल्यामुळे प्रतिबंधित इमारतींची संख्याही वाढली आहे. गेल्या वीस दिवसांत प्रतिबंधित इमारतीची संख्या चार हजारांनी वाढली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2020 12:34 am

Web Title: 81 percent corona free in mumbai abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 ऑक्सफर्ड लशीच्या चाचण्यांना ‘केईएम’च्या समितीची परवानगी
2 असंतोषावर फुंकर!
3 निवडणूक प्रतिज्ञापत्रावरून प्राप्तिकर विभागाची पवारांना नोटीस
Just Now!
X