प्रसाद रावकर

हिवताप, डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वारंवार सूचना करूनही डासप्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सुमारे ८१४ मुंबईकरांविरुद्ध पालिकेने खटला दाखल केला आहे. त्याचबरोबर निष्काळजी नागरिकांकडून सुमारे पावणेसात लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबईमध्ये साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दरवर्षी पालिकेच्या कीटक नियंत्रण विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येते. वस्त्या, झोपडपट्टय़ा, चाळी, उच्चभ्रू वस्त्या, सार्वजनिक ठिकाणे, बंद गिरण्या आदी ठिकाणी पाहणी करून डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट केली जातात. पाण्याच्या टाक्या, फ्लॉवर पॉट, झाडाच्या कुंडय़ांखाली ठेवण्यात येणाऱ्या ताटल्या, वातानुकूलित यंत्रणेचे डक, उघडय़ावर ठेवलेले भंगार साहित्य आदींची या मोहिमेत तपासणी केली जाते. डासांची उत्पत्तिस्थाने सापडल्यानंतर ती नष्ट केली जातात. तसेच या ठिकाणी पुन्हा डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून संबंधितांना सूचना केल्या जातात. काही नागरिक या सूचनांचे तंतोतंत पालन करून काळजी घेतात. मात्र काही मुंबईकर या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अल्पावधीत डासांची नवी उत्पत्तिस्थाने निर्माण होतात आणि साथीच्या आजारांना आयते आमंत्रण मिळते. गतवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबईत करोना संसर्गाने थैमान घालण्यास सुरुवात के ली होती. त्यामुळे करोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर संबंधित ठिकाण र्निजतुक करण्याची जबाबदारी कीटक नियंत्रण विभागावर सोपविली होती. मात्र पावसाळा जवळ आल्यानंतर हे काम घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे सोपविण्यात आले आणि कीटक नियंत्रण विभागाने डास निर्मूलन मोहीम सुरू के ली. करोनाकाळातही या विभागातील अधिकारी, कर्मचारी डास नियंत्रणासाठी ठिकठिकाणी पाहणी करीत होते. त्यामुळे या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही करोनाची बाधा झाली होती.