मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणारी एक ८२ वर्षीय महिला करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरी होऊन आपल्या घरी परतली आहे. भारतात साठ-पासष्ट आणि त्यापुढच्या वयोगटातील नागरिकांचे करोना व्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. वयाची ८० ओलांडलेल्या महिलेने करोना व्हायरसवर मात करणे, हे सकारात्मक संकेत असून इतरांसाठी एक आशेचा किरण आहे. कोकिलाबेन हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्डमध्ये आठवडाभर राहिल्यानंतर ही महिला मागच्या आठवडयात आपल्या कुटुंबीयांना भेटली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

केरळमध्येही वयाची नव्वदी ओलांडलेल्या एका जोडप्याला करोना व्हायरसची लागण झाली होती. हे जोडपे सुद्धा या आजारातून पूर्णपणे बरे झाले. वृद्धांच्या तुलनेत तरुणांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत आहे. त्यामुळे करोनामधून त्यांचे बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

“आमच्या आईचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला पण तिच्यामध्ये करोनाची तीव्र लक्षणे आढळली नव्हती. ती गुजरातला गेली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून आम्ही तिची चाचणी केली. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच, आम्ही तिला रुग्णालयात दाखल केले. आई घरी येईपर्यंत आमच्यासाठी ते दिवस तणावाचे होते. आता तिची प्रकृती सुधारत आहे” असे या ८२ वर्षीय वृद्ध महिलेच्या मुलाने सांगितले.

आणखी वाचा- माझ्यातील परिचारिका स्वस्थ बसू देत नाही, रुग्णसेवेची परवानगी द्या; महापौरांची आयुक्तांना विनंती

वैद्यकीय शिक्षण विभागाने तयार केलेल्या आरोग्य अहवालानुसार, मंगळवारपर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण झालेले ८१ ते ९० वयोगटातील १२ रुग्ण आहेत. बुधवारी ९० ते १०० वयोगटातील फक्त एका व्यक्तीला करोनाची लागण झाली. “८२ वर्षीय वृद्ध महिलेचे करोनामधून बरे होणे आमच्यासाठी आशेचा किरण आहे. करोना व्हायरस म्हणजे वृद्धांसाठी फक्त मृत्यू नाही. या केसने आम्हाला आत्मविश्वास दिला” असे कोकिलाबेन रुग्णालयातील डॉक्टरने सांगितले.