मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा एकदा थोडी वाढली आहे. गुरुवारी ८ हजार २१७ नवीन रुग्णांची नोंद झाली तर मृतांचा आकडाही वाढला असून ४९ रुग्णांचा मृत्यू झाला, तर १० हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील बाधितांचे प्रमाणही किं चित वाढले आहे. दिवसभरात ४५ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १८.०६ टक्के नागरिक बाधित आढळले.

मुंबईत गुरुवारी ८ हजार २१७  नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे  एकूण बाधितांची संख्या ५ लाख ५३ हजारांपुढे गेली आहे.  एका दिवसात १० हजार ९७ रुग्ण  बरे झाल्यामुळे आतापर्यंत ४ लाख ५४ हजार ३११ म्हणजेच ८२ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्त रुग्णांची संख्या  फेब्रुवारीत ९४ टक्क्यांवर होती; मात्र रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे हा दरही ७९ टक्क्यांपर्यंत कमी झाला होता. हा दर किं चित वाढून ८२ टक्के झाला आहे. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही आता कमी होऊ लागली आहे. ही संख्या ९२ हजारांपुढे गेली होती. ती गुरुवारी आणखी कमी होऊन  ८५ हजार ४९४ झाली आहे. त्यापैकी ८० टक्के म्हणजेच ६९ हजार ६५८ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर १८ टक्के म्हणजेच १५ हजार ९१४ रुग्णांना लक्षणे आहेत. गंभीर रुग्णांची संख्या १ हजार २९४ झाली आहे.  करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. बुधवारी ४५ हजार ४८६ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १८.०६ टक्के नागरिक बाधित आहेत.  आतापर्यंत ४८ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

गुरुवारी ४९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यात २९ पुरुष व २० महिलांचा समावेश आहे. ३१ मृतांचे वय ६० वर्षांवरील होते. तर २६ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. १४ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. ३ मृतांचे वय ४० वर्षांखालील होते. मृतांची एकूण संख्या १२ हजार १८९ झाली आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर रोज वाढत असला तरी तो या आठवड्यात काहीसा कमी झाला आहे. सध्या हा दर १.६४ टक्के आहे. तो गेल्या आठवड्यात दोन टक्के होता. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधीही ३४ दिवसांवरून ४२ दिवसांपर्यंत वाढला आहे.

ठाणे जिल्ह््यात ५ हजार ३६४ नवे करोना रुग्ण

ठाणे जिल्ह््यात गुरुवारी ५ हजार ३६४ नवे करोना रुग्ण आढळून आले, तर ३१ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह््यात करोनाबाधितांची संख्या आता ४ लाख १ हजार ५४ इतकी झाली असून मृतांची संख्या ६ हजार ८२५ इतकी झाली आहे.  जिल्ह््यातील ५ हजार  ३६४ करोनाबाधितांपैकी कल्याण डोंबिवली क्षेत्रात १ हजार ५५७, ठाणे १ हजार ५०५, नवी मुंबई १ हजार  ३६, मीरा भाईंदर ४००, बदलापूर २१६, ठाणे ग्रामीण २०२, अंबरनाथ १९२, उल्हासनगर १९० आणि भिवंडीत ६६ रुग्ण आढळून आले. तर  ३१ मृतांपैकी ठाणे आठ, मीरा भाईंदर सहा, नवी मुंबई सहा, कल्याण चार, अंबरनाथ तीन, भिवंडी दोन, ठाणे ग्रामीण एक आणि उल्हासनगरमधील एकाचा समावेश आहे.