मजुरीसाठी बिहार मधून आणलेल्या ८३ बालमुजरांची रेल्वे पोलिसांनी प्रथम या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने कारवाई करून सुटका केली. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सोमवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. बालमजुरचे उघडकीस आलेले मानवी तस्करीचे हे सगळ्यात मोठे रॅकेट मानले जात आहे.
 बिहार मधून मोठ्या प्रमाणात बालकामगार मुंबईत आणणार असल्याची माहिती प्रथम या स्वयंसेवी संस्थेला मिळाली होती. त्यंनी याप्रकरणी रेल्वे पोलिसांना कळवले होते. सोमवारी सकाळी जनसाधारण एक्सप्रेमधून हे बालकामगार आणणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कुर्ला रेल्वे पोलिसांनी सापळा लावला. सकाळी येणारी एक्सप्रेस गाडी पाच तास ऊशीरा आली. या गाडीच्या पुढच्या आणि मागच्या डब्यात हे एकूण दिडशे मुले आणण्यात आली होती. त्यापैकी ८३ अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. त्यातील अनेक मुले हे १२ ते १६ वर्ष वयोगटातील होते. उर्वरित मुलांना सोडून देण्यात आले.
या मुलांसमेवत असणाऱ्या ३८ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी मुलांचे पालक असल्याचा दावा केला मात्र ते एजंट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मुलांना बांधकाम मजूर तसेच जरिकाम करणाऱ्या कारखान्यात कामावर ठेवण्यात येणार होते अशी माहिती तपासात आली आहे. ही मुले बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि नेपाळ येथील आहेत. या मुलांच्या पालकांकडे हजार ते दोन हजार रुपये देऊन त्यांना मुंबईत चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून आणण्यात येत होते. अल्पवयीन आणि पालक नसलेल्या मुलांची रवानगी डोंगरीच्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे. कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धोपावकर, पोलीस निरीक्षक महेश बाबर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.