२० जिल्ह्य़ांत शंभर टक्क्य़ांपेक्षा जास्त पाऊस

राज्यातील जनतेला गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले. यंदा मात्र वरुणराजाने भरभरून कृपा केल्याने राज्यातील धरणे काठोकाठ भरली. सध्या लहान, मध्यम व मोठय़ा धरणांमध्ये सरासरी ८३ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पुढील वर्षांच्या पावसाच्या आगमनापर्यंत पाणी टंचाईची चिंता राहणार नाही.

गेल्या दोन-तीन वर्षांत राज्याच्या एका भागात चांगला पाऊस झाला, तर दुसऱ्या भागात पावसाने ओढ दिली. यंदा  मराठवाडय़ासह सर्वत्र चांगला पाऊस पडला. त्यामुळे भूजलपातळीत व धरणांतील साठय़ांमध्येही  वाढ आहे.

सध्या सर्व धरणांमध्ये ८३.५३ टक्के पाणीसाठा आहे. याच सुमारास गेल्या वर्षी ४२.४० टक्के पाणीसाठा होता. म्हणजे या वर्षी  मराठवाडय़ातील धरणांमध्ये  ७७.२५ टक्के पाणीसाठा आहे, गेल्या वर्षां फक्त ५.५३ टक्के पाणी शिल्लक राहिले होते. कोकणात ९३ टक्के, नागपूर विभागात ६६.६९ टक्के, अमरावती विभागात ७६.२६ टक्के, नाशिक विभागात ८८.१७ टक्के आणि पुणे विभागात ८८.८९ टक्के पाणीसाठा आहे.

यंदा वीस जिल्हय़ांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यात ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, िहगोली, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती व गडचिरोली यांचा समावेश आहे. कोल्हापूर व भंडारा  जिल्ह्य़ांत  कमी, म्हणजे ५१ ते ७५ टक्के पाऊस पडला. उर्वरित जिल्ह्य़ांमध्ये ७६ ते १०० टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे.