संदीप आचार्य

मुंबईमधील करोना चाचण्यांची संख्या एकीकडे आम्ही वाढवत आहोत तर दुसरीकडे पालिका रुग्णालयात वेळेत रुग्ण दाखल करून प्रभावी उपचार देत असल्यामुळे करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण आणखी कमी करण्याचा प्रयत्न असून एकूण ८४,५७० रुग्ण आजपर्यंत बरे झाल्याचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले.

मुंबईत करोना रुग्ण व त्यांच्या संपर्कातील लोकांना शोधण्याचे काम आम्ही युद्धपातळीवर करत आहोत. एका रुग्णामागे संपर्कातील २० लोकांना शोधण्याचे आदेश मी यापूर्वीच दिले होते. प्रत्याक्षात सध्या १० ते १२ लोकांना आम्ही शोधत असून अनेक भागात लोकांमध्ये सोशल डिस्टंसिंगची जाणीव वाढल्यामुळे हे प्रमाण कमी असल्याचे आढळून येत असल्याचे आयुक्त चहल म्हणाले. जास्तीजास्त करोना रुग्ण शोधण्यासाठी आम्ही चाचण्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून परवा ८७७६ चाचण्या केल्या होत्या तर आजची आकडेवारी १०,७२७८ एवढी असून यात ११०० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

तथापि रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या म्हणजे अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण हे २०० रुग्णांच्या आसपास असल्याचे आयुक्त चहल म्हणाले. महापालिकेने रुग्णवाढ तसेच पावसाळी साथीच्या आजारांचा विचार करून रुग्णालयीन व्यवस्था वाढवली आहे. आज पालिकेकडे २१,८३५ बेड असून यातील तब्बल १०,७२८ बेड रिकामे आहेत. अतिदक्षता विभागात १७७६ बेड असून आजच्या दिवशी यातील २३४ बेड रिकामे असल्याचे आयुक्त चहल म्हणाले. ऑक्सिजन बेडची संख्या ११,२९७ असून ५२७६ बेड रिकामे आहेत तर १०८९ व्हेंटिलेटर बेड पैकी १४० बेड रिकामे आहेत. आमच सार लक्ष आता करोना चे मृत्यू आणखी कमी कसे करता येतील याकडे असून लवकरच मृत्यूचे प्रमाण आम्ही कमी करू असा विश्वास आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी व्यक्त केला.

याचाच अर्थ रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण एकीकडे कमी होत आहे तर दुसरीकडे प्रभावी व तातडीने उपचार होत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण हे ४० ते ५५ च्या दरम्यान आले असून यातही ठाण्यासह एमएमआर विभागातून शेवटच्या टप्प्यातील गंभीर रुग्णांमुळे हे मृत्यू जास्त दिसत असल्याचे पालिकेच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. अनेक गंभीर करोना रुग्णांना शेवटच्याक्षणी मुंबईत उपचारासाठी दाखल केले जात असल्याचे व त्यातील किती लोकांचे मृत्यू झाले हे समजणे कठीण असल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

गेल्या महिनाभरात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या रोजच्या रोज कमी होत असून गेल्या महिन्यात २५ हजाराच्या आगेमागे असलेली रुग्ण रुग्ण संख्या वेगाने कमी होत आज रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १९,९९० एवढी कमी झाल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले. मुंबईतील एकूण करोना रुग्णांची संख्या एक लाख ८८२ एवढी असून ८४,५७० रुग्ण बरे झाले आहेत तर केवळ १९,९९० रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. राज्यातही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून ५९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील एकूण ३,९१,४४० रुग्णांपैकी २,३२,२७७ रुग्ण आजपर्यंत बरे झाले आहेत.

मुंबईपुरता विचार करायचा झाल्यास चाचण्यांची संख्या वाढवून रुग्ण शोधण्याचे व संपर्कातील लोकांना शोधण्याचे काम जोरात सुरु आहे. तसेच व्यापक जनजागृती केल्याचे परिणामही आता दिसू लागत आहे. यातूनच ११ हजारापेक्षा जास्त चाचण्या करूनही केवळ १० टक्के रुग्ण करोनाबाधित दिसून आल्याचे आयुक्त चहल म्हणाले. चाचण्यांची संख्या वाढवणे, रुग्णांना वेळेत व प्रभावी उपचार आणि मृत्यूचे प्रमाण कमी करणे याला प्राधान्य देत पालिकेचा आज करोना विरोधी लढा सुरु आहे.