मुंबई : राज्याच्या सर्व भागात पाऊस पोहोचला असून आतापर्यंत सरासरी ८२३ मिलीमीटर म्हणजेच एकूण सरासरीच्या ८६.१ टक्के पाऊस झाला आहे. तसेच राज्यातील जलाशयांमध्ये ६६ टक्के साठा निर्माण झाला असून खरीप हंगामात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तराही काही भागात पाऊस न झाल्याने ३०९ गावे आणि ३२२ वाडय़ांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

राज्यात मागील वर्षांपेक्षा यावेळी चांगला पाऊस झाला आहे. यावर्षी सरासरीच्या ८६ टक्के पाऊस झाला असून गेल्या वर्षी याच सुमारास ७८ टक्के पाऊस झाला होता. राज्यातील ११  जिल्ह्यंमध्ये १०० टक्के पेक्षा जास्त पाऊस पडला असून त्यामध्ये ठाणे, रत्नागिरी, पालघर, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, हिंगोली, अकोला, वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यंचा समावेश आहे. तर ५० ते ७५ टक्के पेक्षा कमी पावसाची नोंद नाशिक, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यत झाली आहे.राज्यातील धरणांमध्ये ६६ टक्के पाणी साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास ६४ टक्के साठा होता. राज्यात सर्वाधिक जलसाठा कोकण विभागात ९३ टक्के असून  पुणे विभागात ८७टक्के, नाशिक विभागात ६३ टक्के, अमरावती विभागात ५४ टक्के, नागपूर विभागात ४८ टक्के  पाणीसाठा आहे.