करोनामुळे उद्योग-व्यवसायांपुढे मंदीचे आव्हान असताना चांगल्या पावसामुळे यंदा शेतकरी मात्र आनंदात आहे. आतापर्यंत राज्यात खरिपाची ८७.४५ टक्के  पेरणी झाली असून मागच्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १७ टक्क्यांनी अधिक आहे. जलाशयांमध्ये गतवर्षांच्या तुलनेत जास्त साठा असला तरी पाणलोट क्षेत्रांत अजूनही पाऊस आवश्यक आहे. सर्वाधिक पेरणी पुणे विभागात झाली असून त्या भागात सरासरीपेक्षा जास्त अशी ११८ टक्के  खरिपाची पेरणी झाली आहे. औरंगाबादमध्ये ९७.४२ टक्के  पेरणी झाली आहे. नाशिक विभागात ८७.९० टक्के  पेरण्या झाल्या आहेत. कोल्हापूर विभागात ९१.९९ टक्के  क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली. लातूर विभागात ८९.२८ टक्के  क्षेत्रावर पेरणी झाली. अमरावतीमध्ये ८९.७० टक्के , तर नागपूर विभागात ६३.५८ टक्के  क्षेत्रावर पेरणी झाली.