मुंबईमध्ये बुधवारी ८७१ करोनाबाधित आढळले, तर १६ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवाळीदरम्यान मुंबईतील चाचण्यांची संख्या घटली होती, मात्र आता दिवाळीनंतर चाचण्यांची संख्या पुन्हा वाढवण्यात येणार आहे. लोकांशी सगळ्यात जास्त संपर्क ज्यांचा येतो अशा क्षेत्रातील व्यक्तींच्या चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. मंगळवारी ११ हजाराहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. मात्र त्यापैकी ८७१ रुग्ण बाधित आढळले आहेत. पुढील काही दिवस केल्या जाणाऱ्या चाचण्यांपैकी किती रुग्ण बाधित आले त्यावर (पॉझिटिव्हिटी रेट) लक्ष ठेवले जाणार आहे.

दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढेल अशी शक्यता असल्यामुळे बुधवारी रुग्णसंख्या किती असेल याकडे लक्ष लागले होते. गेल्या दोन दिवसांत ४०० ते ५०० रुग्ण आढळत होते, तर बुधवारी या रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याच्या कालावधी ३०० दिवसांच्या पुढे गेला आहे. सरासरी कालावधी ३२० दिवसांवर गेला आहे. तर एके काळी अतिसंक्रमित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भायखळा, माझगावमध्ये हाच कालावधी ८०० दिवसांवर गेला आहे.

आतापर्यंत मुंबईत १७ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. दिवाळीनंतर या चाचण्यांमध्ये अजून वाढ होईल. मुंबईतील एकूण रुग्णांपैकी ९१ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर सध्या केवळ ८,६५८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ६१८ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात बुधवारी ६१८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या २ लाख २० हजार ७९८ वर पोहोचली आहे. दिवसभरात १६ जणांचा मृत्यू झाला असून, करोनाबळींची संख्या ५ हजार ५५४ इतकी झाली आहे.

बुधवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील १७९, कल्याण-डोंबिवली शहर १३३, नवी मुंबई १३१, ठाणे ग्रामीण ६१, मीरा-भाईंदर ४४, उल्हासनगर २३, बदलापूर १७, अंबरनाथ १६ आणि भिवंडीतील १४ रुग्णांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये ठाणे शहरातील ६, नवी मुंबई ३, मीरा-भाईंदर ३, ठाणे ग्रामीण २, कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

देशाची रुग्णसंख्या ८९ लाखांवर

* देशात गेल्या २४ तासांत ३८,६१७ करोनाबाधित आढळले असून, एकूण रुग्णसंख्या ८९,१२,९०७ वर पोहोचली आहे. दिवसभरात ४७४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनाबळींची संख्या १,३०,९९३ झाली आहे. सलग आठ दिवसांपासून उपचाराधीन रुग्णांची संख्या पाच लाखांखाली आहे. सध्या देशभरात ४,४६,८०५ रुग्णांवर उपचार सुरू असून, हे प्रमाण ५.०१ टक्के आहे. करोनामुक्त रुग्णांची संख्या ८३,३५,१०९ आहे. हे प्रमाण ९३.५२ टक्के आहे.

* दिल्लीत करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. दिल्लीमध्ये ४५ डॉक्टर आणि १६० निमवैद्यकीय दलाचे कर्मचारी दाखल झाले असून रेल्वेने स्थानकावरच रेल्वे डब्यांमध्ये ८०० खाटा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्यांचा वापर आरोग्य आणि विलगीकरण केंद्रे म्हणून केला जाणार आहे, असे गृह मंत्रालयाने सांगितले.

* डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेण्ट ऑर्गनायझेशन ३५ बीआयपीएपी खाटांसाठी विमानतळाजवळील कोविड-१९ रुग्णालयात आणखी २५० अतिदक्षता खाटा उपलब्ध करून देणार आहे, असे गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.

राज्यात २४ तासांत पाच हजार रुग्ण : गेल्या आठवडय़ात राज्यात दैनंदिन अडीच ते तीन हजार नवे रुग्ण आढळत होते. पण गेल्या २४ तासांत पाच हजारांपेक्षा नवे रुग्ण आढळले आहेत. याच काळात १०० जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या ८० हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यात १७ लाख, ५७ हजार करोनाबाधित झाले असून, ४६,२०२ जणांचा मृत्यू झाला.