मुंबई : मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी पुन्हा एकदा वाढत असून सध्या २३२ दिवसांवर पोहोचला आहे. गुरुवारी ८७८ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर १८ जणांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांची संख्या २ लाख ८३ हजारांच्यापुढे गेली आहे.

गुरुवारी ७६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत २ लाख ५८ हजारांहून अधिक म्हणजेच ९१ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या १३,१५४ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी ८५६० रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत तर केवळ ३०२४ रुग्णांना लक्षणे आहेत. तसेच ८५६ रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ६५१ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात गुरुवारी ६५१ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या दोन लाख ३० हजार ७२२ हून अधिक झाली आहे. दिवसभरात आठ जणांचा मृत्यू झाल्याने करोनाबळींची संख्या ५ हजार ७१० इतकी झाली आहे.

राज्यात २४ तासांत ५१८२ करोनाबाधित

राज्यात गेल्या २४ तासांत ५१८२ करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले, तर ११५ जणांचा मृत्यू झाला. विविध रुग्णालयांत सध्या ८५,५३५ रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात आतापर्यंत ४७,४७२ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील करोनामुक्तांचे प्रमाण ९४.११ टक्क्यांवर

देशातील करोनाबाधितांच्या संख्येने ९५ लाखांचा आकडा ओलांडला असून, करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ८९.७३ लाखांवर गेली आहे. त्यामुळे करोनामुक्तांचे प्रमाण ९४.११ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या २४ तासांत ३५ हजार ५५१ करोना रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या ९५ लाख ३४ हजार ९६४ वर पोहोचली आहे. तर करोनामुळे ५२६ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या एक लाख ३८ हजार ६४८ इतकी झाली आहे.