मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या दर दिवशी वाढत असताना गुरुवारी मात्र अचानक रुग्णांची संख्या कमी नोंदवली गेली आहे. गुरुवारी ८९३८ नव्या रुग्णांची नोंद झाली तर २३ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात ४८ हजार ९०२ चाचण्या करण्यात आल्या. त्या तुलनेत बाधितांचे प्रमाण १८.२७ टक्के  आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ८६ हजारांच्यापुढे गेली आहे, तर रुग्णदुपटीचा कालावधी एक महिन्यावर आला आहे.

मुंबईत गुरुवारी ८९३८ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या चार लाख ९१ हजार ६९८ झाली आहे. एका दिवसात चार हजार ५०३ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत तीन लाख ९२ हजार ५१४ म्हणजेच ८० टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्त रुग्णांची संख्या फेब्रुवारीत ९४ टक्क्यांवर होती. मात्र रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे हा दरही आता कमी झाला आहे. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढत असून सध्या ८६ हजार २७९ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ६७ हजार ५५० रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर १३,१९६ रुग्णांना लक्षणे आहेत. गंभीर रुग्णांची संख्या एक हजाराच्यापुढे गेली आहे.

करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले असून गुरुवारी ४८ हजार ९०२ चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांपैकी तब्बल १८ टक्क्यांहून अधिक नागरिक बाधित आहेत. या चाचण्यांपैकी १७,७०० हजार प्रतिजन चाचण्या आहेत, तर ३१,२०० आरटीपीसीआर चाचण्या आहेत. आरटीपीसीआर चाचण्यांमधील बाधितांचे प्रमाण २० टक्क्यांच्यावर आहे, तर प्रतिजन चाचण्यांमधील बाधितांचे प्रमाण १० टक्क्यांच्या पुढे आहे. आतापर्यंत ४४ लाख ५४ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

गुरुवारी २३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यात १९ पुरुष व ४ महिलांचा समावेश होता. १६ मृतांचे वय ६० वर्षांवरील होते. मृतांची एकूण संख्या ११ हजार ८७४ झाली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर रोज वाढत असून तो दोन टक्क्यांच्यापुढे गेला आहे. मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधीही ३३ दिवसांपर्यंत  खाली आला आहे.

अतिदक्षता विभागाच्या ७२ खाटाच शिल्लक

रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे गंभीर रुग्णाची संख्याही वाढू लागली आहे. मुंबईत सध्या १,१४० रुग्णांची स्थिती गंभीर आहे, तर दुसरीकडे अतिदक्षता विभागाच्या व कृत्रिम श्वसन उपकरणाच्या खाटाही व्यापल्या जाऊ लागल्या आहेत. सध्या अतिदक्षता विभागात के वळ ७२ खाटा शिल्लक  आहेत. यात खासगी रुग्णालयातील ४० खाटांचा समावेश आहे. तर कृत्रिम श्वसन यंत्रणेच्या के वळ २८ खाटा शिल्लक असून त्यात खासगी रुग्णालयातील १४ खाटांचा समावेश आहे.