राज्यात करोना रुग्णवाढ स्थिर असली तरी मंगळवारी मृतांच्या संख्येने आतापर्यंचा उच्चांक नोंदवला. दिवसभरात ८९५ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ६६,३५८ नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबई, ठाण्यात मात्र नव्या रुग्णसंख्येत घट कायम आहे.

दिवसभरात मुंबईत ५९, ठाणे जिल्ह्यात ६५, नाशिक विभाग १३५, पुणे विभाग १२२, मराठवाडा २८१, विदर्भ १८८ करोनाबळींची नोंद झाली. औरंगाबाद शहरात १४३ मृतांची नोंद झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाण्यातील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. मंगळवारीही हाच कल कायम राहिला. गेल्या २४ तासांत मुंबईत ४,०१४ तर ठाणे जिल्ह्याात ३ हजार २४२ करोनाबाधितांची नोंद झाली. ठाणे शहरासह कल्याण-डोंबिवलीतील रुग्णसंख्येत मोठी घट नोंदविण्यात येत असल्याने ठाणे जिल्ह्यातील नव्या रुग्णांमध्ये झपाट्याने घसरण होत आहे.

नव्या रुग्णांपेक्षा करोनामुक्त दुप्पट

मुंबईत मंगळवारी ४,०१४ नवे रुग्ण आढळले. मात्र, याच कालावधीत ८,२४० रुग्ण करोनामुक्त झाले. मुंबईतील करोनामुक्तांचे प्रमाण ८७ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ६८ दिवसांवर गेला आहे.

देशातील मृतांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर

देशात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येत गेल्या २४ तासांत अंशत: घट नोंदविण्यात आली. दिवसभरात देशात ३,२३,१४४ रुग्ण आढळले, तर २,७७१ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील करोनाबळींची एकूण संख्या (१,९७,८९४) दोन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. एकूण रुग्णसंख्या १,७६,३६,३०७ वर पोहोचली. त्यातील १,४५,५६,२०९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.