कचरावाहू गाडय़ांच्या अपुऱ्या संख्येमुळे मुंबईत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचत असताना पालिकेला मात्र अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा वावर असलेल्या रस्त्यांची चिंता लागली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची जा-ये असलेले रस्ते कंत्राटदार संस्थेच्या स्वयंसेवकांकडून स्वच्छ करून घेण्यासाठी सुमारे सव्वानऊ लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात येत आहे. कंत्राटदार संस्थेचे कंत्राट संपुष्टात आल्याने त्याला ८९ दिवसांसाठी मुदतवाढ देण्याकरिता पालिकेची धडपड सुरू झाली आहे.
पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगार दररोज भल्या पहाटे झाडलोट करून मुंबईचा कानाकोपरा स्वच्छ करतात. मात्र अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची जा-ये असलेल्या रस्त्यांची दुपारी साफसफाई करण्याची जबाबदारी पालिकेने कंत्राटदार संस्थेवर सोपविली आहे. बी. ए. रोड, जे. जे. रोड, क्लेअर रोड, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक परिसर, आनंदराव नायर रोड, साने गुरूजी मार्ग, आर्थर रोड नाका परिसर, बी. जे. रोड, एन. एम. जोशी मार्ग, के. के. मार्ग, बेलासीस रोड या रस्त्यांची दुपारच्या वेळी जय बालाजी वेल्फेअर संस्था आणि राष्ट्रीय नागरी सेवा सहकारी संस्थेच्या स्वयंसेवकांमार्फत साफसफाई करण्यात येत होती. मात्र या संस्थांना देण्यात आलेल्या कंत्राटाची मुदत संपुष्टात आली आहे. एखाद्या कंत्राटदाराने काम केल्यानंतर त्याला पुन्हा ते देऊ नये अशा सूचना आहे.
कंत्राटदार संस्थांचे कंत्राट संपुष्टात आल्यामुळे निविदा मागवून नव्या संस्थांना हे काम देणे बंधनकारक आहे. मात्र जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने या कामात खंड पडू नये असे कारण पुढे करून प्रशासनाने जय बालाजी वेल्फेअर संस्था आणि राष्ट्रीय नागरी सेवा सहकारी संस्था या दोघांना २ जानेवारी ते ३१ मार्च या काळासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.