सात वर्षांत २३ चालक दोषी; ९ जणांवर निलंबनाची कारवाई

मुंबई : मोबाइलवर बोलताना वाहन चालविणे हा गुन्हा आहे. असे असतानाही एसटी चालकांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. मोबाइलवर बोलताना एसटी चालवणारे २३ चालक सात वर्षांत दोषी आढळले आहेत. या सर्वावर कारवाई करण्यात आली असून यातील नऊ चालकांना निलंबितही करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाच्या चालकांनी याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे. वाहन चालविताना मोबाइलवर बोलूू नये, असा नियम आहे. या संदर्भात चालकांचे एसटी महामंडळाकडून प्रबोधनही केले जाते. परंतु चालक हा नियम पाळत नाहीत. गेल्या काही महिन्यात तर मोबाइलवर बोलताना एसटी चालवणाऱ्या चालकांचे व्हिडीओ आणि फोटोही ही सोशल मीडियावर पाहण्यास मिळाले. या संदर्भात एसटी महामंडळाने १४ जून रोजी राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून मोबाइलवर बोलणे प्रतिबंध असतानाही चालक त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत नसल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले. त्यामुळे हा नियम न पाळलेल्या प्रकरणांची माहिती एसटीकडून घेण्यात आली. यात मार्च २०११ ते जून २०१८ पर्यंतची सर्व विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीत २३ चालक दोषी आढळल्याचे सांगण्यात आले. कर्तव्यावर असलेला चालक मोबाइलवर बोलताना आढळल्यास यामध्ये ५० रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात आला आहे. तर एक वर्षांपर्यंत वेतनवाढ कायमस्वरूपी स्थगित करतानाच निलंबनाचीही कारवाई करण्यात आली आहे. २३ पैकी ९ चालकांना तर निलंबितही केले आहे. एसटीच्या सिंधुदुर्ग, औरंगाबाद, सोलापूर, बीड, अहमदनगर, जालना, उस्मानाबाद, सातारा, सांगली, नाशिक, पुणे, ठाणे, कोल्हापूर, परभणी विभागात या कारवाई करण्यात आल्या आहेत.

‘संपकाळात गैरहजरप्रकरणी कारवाई थांबवा’

मुंबई : एसटीच्या दोन दिवसांच्या अघोषित संप काळात कामावर गैरहजर राहणाऱ्या नवीन कर्मचाऱ्यांवर सेवामुक्ती करण्याची कारवाई महामंडळाकडून करण्यात येत आहे. यात जवळपास १,१०० कर्मचारी असून त्यांच्यावरील ही कारवाई थांबवविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

वेतनवाढीसाठी ८ आणि ९ जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांकडून संप करण्यात आला होता. यामध्ये नवीन कर्मचारी म्हणून भरती झालेल्या चालक कम वाहक, साहाय्यक व अनुकंपातत्त्वावर लागलेल्या कामगारांना संपात सहभागी झाल्याच्या कारणास्तव सेवामुक्त करण्याचे एसटीच्या मुख्यालयाकडून दूरध्वनी गेले आहेत. कोणत्याही कर्मचाऱ्यास तडकाफडकी सेवामुक्ती करू नये, या उद्देशाने एसटी महामंडळात शिस्त व अपील कार्यपद्धतीचे नियम ठरले आहेत. त्यातील तरतुदीनुसार महामंडळामध्ये कारवाई करण्याचे बंधन आहे. असे असतानाही तरतुदींचा भंग करून सुमारे १,१०० कामगारांना सेवामुक्ती करण्याचे आदेश दिले असल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून सांगण्यात आले. यामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. कामगारांना दिलेला शब्द प्रशासन पाळत नसून ही कारवाई न थांबल्यास आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल, असा इशारा संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी दिला आहे.