ठाणे: कळवा येथील महात्मा फुले परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळील पाण्याच्या टाकीत पडून एका नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. परिसरातील रहिवाशांनी महापालिकेच्या कळवा प्रभाग समिती कार्यालयावर मोर्चा काढून रोष व्यक्त केला.

कुणाल सुरेश बागूल (९) असे मृत पावलेल्या मुलाचे नाव असून तो कळव्यातील महात्मा फुलेनगरमधील साईनाथनगर भागात राहत होता. शुक्रवारी सायंकाळी तो परिसरातील महापालिकेच्या शौचालयासाठी गेला होता.शौचालयाजवळील पाण्याच्या टाकीतून पाणी घेताना त्याचा तोल जाऊन तो टाकीत पडला.टाकीची खोली जास्त असल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. काही वेळानंतर सफाई कामगार तिथे आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

खड्ड्यातील पाण्यात पडून तरुणाचा मृत्यू
मुंबईतील कुर्ला परिसरात इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडून एका तरुणाचा शुक्रवारी मृत्यू झाला. कुर्ला (पश्चिम) येथील प्रीमिअर रोडवरील डॉन बॉस्को सर्कलजवळील एचडीआयएल कम्पाऊंडमध्ये येथे खासगी विकासकामार्फत बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या बांधकामासाठी तेथे खड्डा खोदण्यात आला होता. या खड्डय़ातील पाण्यात परशुराम घाडगे (२८) पडले. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेतली आणि परशुराम यांची शोधमोहीम सुरू केली. खड्ड्यामधून परशुराम यांना बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.