परराज्यात जाणाऱ्या कामगारांसाठी एसटी महामंडळाने मोफत बस सेवा चालवली. या सेवेपोटी एसटी महामंडळाला राज्य शासनाकडून २१ कोटी रुपये मिळाले असून ९० कोटी रक्कम मिळालेली नाही.

टाळेबंदीत कामगारांनी मोठय़ा प्रमाणात  परराज्यात स्थलांतर केले. पायी जाणाऱ्या या कामगारांसाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार मोफत एसटी बस देण्यात आल्या. राजस्थान, गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बसगाडय़ा धावल्या. यातून सुमारे १० लाख कामगारांची वाहतूक करण्यात आली. यासाठी चालक-वाहकांनी जीव धोक्यात घालून राज्याच्या सीमेपर्यंत बस चालविल्या. तर ही सेवा देताना महामंडळाला इंधनाचाही खर्च आला. मोफत प्रवासाचे आदेश असल्याने या सेवेपोटीची १११ कोटी रुपये रक्कम राज्य शासनाने एसटी महामंडळाला अदा करण्याचे ठरले. यातील २१ कोटी रुपये मिळाले आहेत. परंतु उर्वरित रक्कम प्राप्त झालेली नाही. याशिवाय मुंबई महानगर परिसरात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मोफत बस प्रवास देण्यात आला. या सेवेपोटीही मुंबई पालिकेकडून १४ कोटी रुपये एसटी महामंडळाला मिळणार आहे.