मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) या मेट्रो मार्गिकेच्या डेपोसाठी गोरेगाव आणि दहिसर येथील जागा उपलब्ध नसल्यामुळे मेट्रो २ ए (दहिसर ते डी. एन. नगर) या मर्गिकेच्या डेपोचा वापरच दोन्ही मार्गिकांना करावा लागणार आहे. या दोन्ही मार्गिका वर्षअखेर कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. चारकोप येथील डेपोचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, डेपोअभावी मार्गिका कार्यान्वित होण्याचे रखडणार नसल्याचे प्रतिपादन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केले आहे.

वर्षअखेर सुरू होणाऱ्या मेट्रो ७ मार्गिकेच्या डेपोसाठी गोरेगाव आणि दहिसर येथील दोन जागांचा पर्याय होता. दहिसर येथील जागा भारतीय विमानतळ प्राधिकरणाची असून, गोरेगाव येथील जागेवर विधि विद्यापीठ प्रस्तावित असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या जागा उपलब्ध होण्यास विलंब लागत असल्यामुळे चारकोप येथील डेपोमध्येच मेट्रो ७ वरील मेट्रो गाडय़ांना सामावून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे मेट्रो ७ मार्गिकेवरील दहिसर या अंतिम स्थानकापासून चारकोप डेपोपर्यंतचे सात किमीचे अधिकचे अंतर मेट्रो गाडय़ांना रोज पार करावे लागेल. चारकोप येथील डेपो हा मुख्यत: मेट्रो २ ए मार्गिकेसाठी बांधण्यात येत आहे.

चारकोप येथील डेपो बांधणीचा खर्च सुमारे ११० कोटी रुपये असून, सध्या ९० टक्के काम पूर्ण झाले असून मेट्रोचा पहिली ट्रेन दाखल होण्यापूर्वी काम पूर्ण होईल असा विश्वास एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. डेपोचे बांधकामाचे काम पूर्ण झाले असून, इतर यंत्रणांच्या कामासाठी संबंधित कंत्राटदारास डेपोचा ताबा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चारकोप येथील डेपो हा १६.४ हेक्टरवर उभारण्यात येत असून, यामध्ये २५ मार्गिका आहेत. आठ डब्यांच्या २४ मेट्रो गाडय़ा यामध्ये सामावून घेता येतील.

एमएमआरडीएने मेट्रो ७, मेट्रो २ ए आणि मेट्रो २ बी या तीन मार्गिकांसाठी प्रत्येकी सहा डब्यांच्या ६३ मेट्रो गाडय़ांच्या उत्पादनाचे कंत्राट दिले आहे. मेट्रो डब्याच्या प्रारूपाचे उद्घाटन पंतप्रधानांनी सप्टेंबरमध्ये केले होते, तर सहा डब्यांची पहिली ट्रेन सप्टेंबर २०२० मध्ये दाखल होईल.

कंत्राटदारांवर कारवाई : गेल्याच आठवडय़ात मंडाले येथील डबल डेकर डेपोचे काम करणाऱ्या कंत्राटदारास एमएमआरडीएने कामात प्रगती न केल्यामुळे नारळ दिला, तर मेट्रो ७ मार्गिकेवरील कामाच्या दिरंगाईप्रकरणी आणखी एक कंत्राट रद्द करण्यात आले. या पाश्र्वभूमीवर वर्षअखेर उद्दिष्ट असलेल्या मेट्रो मार्गिका कार्यान्वित होणार का यावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.