करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मास्क परिधान करण्याच्या सूचना सरकारकडून करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईदेखील सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेनं मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून आतापर्यंत साडेतीन कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम वसूल करण्यात आली आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशान्वये सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क परिधान करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ९ एप्रिलपासून मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. सुरूवातीच्या काळात दंडाची रक्कम १ हजार रूपये इतकी होती. परंतु आता ती २०० रूपये करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या ‘परिमंडळ-१’मधील नरिमन पॉइंट, कुलाबा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फोर्ट, मोहम्मद अली रोड, भेंडी बाजार, पायधुनी, काळबादेवी, गिरगाव, भायखळा, माझगाव या भागात सर्वाधिक दंड वसूल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या विभागांमध्ये २८ हजार २९२ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. तसंच त्यांच्याकडून ६५ लाख ५६ हजार रूपयांचा दंड पालिकेनं वसूल केला आहे.

आणखी वाचा- मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, सलग तिसऱ्या दिवशी आढळले एक हजारापेक्षा जास्त रुग्ण

त्यानंतर चेंबूर , कुर्ला, गोवंडी या भागांमध्ये २१ हजार ३१२ जणांवर करण्यात आलेल्या कारवाईतून ४७ लाख २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पालिकेच्या अन्य चार परिमंडळांमध्ये २० हजारांहून अधिक नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून अंधेरी पश्चिम परिसरात सर्वाधिक म्हणजे ८ हजार ८९० जणांकडून दंड वसूल करण्यात आला.

मास्क नाही प्रवेश नाही

सध्या राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अशातच करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे विविध स्तरावर कार्यवाहीदेखील सुरू आहे. दरम्यान, ‘विना मास्‍क’ विषयक जनजागृती करतानाच दंडात्‍मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश महापालिका आयुक्‍त इक्‍बाल सिंह चहल यांनी यापूर्वी दिले होते. या अंतर्गत मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालये, आस्‍थापना, मॉल्‍स, सोसायटी, सभागृह इत्‍यादी ठिकाणी ‘मास्‍क नाही, प्रवेश नाही’; ‘नो मास्‍क, नो एन्‍ट्री’ अशा आशयाचे फलक लावण्‍याचे निर्देश देण्यात आले होते. त्‍याचबरोबर सर्व बसेस, टॅक्‍सी, रिक्षांदेखील याच आशयाचे स्‍टीकर्स लावण्‍याचे निर्देशही देण्यात आले असून सध्या सर्वत्र ही मोहीम राबवली जात आहे.