मुंबईतील करोनामुक्त रुग्णांची संख्या ९१ टक्के इतकी झाली असून, सध्या केवळ १० हजार ७७ रुग्ण उपचाराधीन आहेत. शनिवारी ७२६ करोनाबाधित आढळले, तर १६ जणांचा मृत्यू झाला.

करोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही २४३ दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा दर ०.२९ टक्के असून, दर दिवशी एक हजाराच्या आत रुग्णांची नोंद होत आहे. मुंबईतील सर्व २४ विभागांत दैनंदिन रुग्णांची संख्या घटू लागली आहे. तसेच बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

शनिवारी ८५० रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आतापर्यंत ९१ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या उपचाराधीन असलेल्या १० हजार ७७ रुग्णांपैकी ५९१९ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर ३५०५ रुग्णांना लक्षणे आहेत. तर ७५७ रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे.

मुंबईत दरदिवशी १० हजाराच्या आसपास चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत १६ लाख ७९ हजाराहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ५४३ नवे रुग्ण : ठाणे जिल्ह्य़ात शनिवारी ५४३ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख १९ हजार १११ वर पोहोचली आहे. दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाल्याने करोनाबळींची संख्या ५ हजार ५१५ इतकी झाली आहे.