दिशा खातू

‘ऑपरेशन मुस्कान’च्या माध्यमातून शोध सुरू

गेल्या सात वर्षांमध्ये मुंबईतून तब्बल २० हजार अल्पवयीन मुले बेपत्ता झाली होती. त्यापैकी ९२० मुला-मुलींचा शोध अद्यापही लागलेला नाही. पोलिसांनी या मुलांचा शोध घेण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ हाती घेतले आहे. या मोहिमेच्या यंदाच्या सातव्या टप्प्यात पहिल्या आठवडय़ातच ४८ मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होण्याचे आणि विविध कारणांसाठी त्यांचे अपहरण करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. २०११ ते २०१८ या सात वर्षांमध्ये मुंबईतून तब्बल २० हजार ६८७ अल्पवयीन मुले – मुली बेपत्ता झाली होती. त्यात ८ हजार ७८ मुले आणि १२ हजार २०९ मुलींचा समावेश होता. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून बहुतांश मुले घरी परतली, तर अनेक मुलांचा शोध लावण्यात पोलिसांनाही यश आले. परंतु, तरीही ९२० मुला-मुलींचा शोध लागू शकलेला नाही. त्यात ४५८ मुले आणि ४६२ मुलींचा समावेश आहे.

अल्पवयीन मुले बेपत्ता होत असून त्यांचा शोध लागत नसल्याने सर्वोच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली होती. न्यायालयाने बेपत्ता मुलांचा शोध गांभीर्याने घेतला जावा यासाठी प्रत्येक अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी बेपत्ता असेल तर अपहरण संदर्भातील कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

‘ऑपरेशन मुस्कान’

* बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ‘ऑपरेशन मुस्कान’ ही मोहीम २० फेब्रुवारीपासून हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच आठवडय़ात पोलिसांना ४८ मुला-मुलींचा शोध लावण्यात यश आले.

* येत्या ५  मार्चपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती या मोहिमेचे समन्वयक पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.

* मागील वर्षी डिसेंबरमध्ये ‘मुस्कान मोहिमे’अंतर्गत २६७ मुला – मुलींचा शोध लागला होता.

प्रथम संस्थेची मदत

प्रथम ही संस्था मागील सात वर्षांंपासून मुलांच्या न्याय आणि हक्कांसाठी पोलिसांबरोबर काम करत आहे. रस्त्यावरील बेघर, भिक्षेकरी मुलांना त्यांच्या घरी पोहोचवणे, घर मिळवून देणे तसेच बालकामगारांची सुटका करत असते. या संस्थेच्या मदतीने पोलिसांनी आगरीपाडा येथील १७ बालकामगारांची सुटका क रण्यात आलेली आहे. प्रथम संस्थेने ‘मुस्कान’ मोहीम सुरू होण्यापूर्वी पोलिसांना १०७ बालकामगार आणि १६० भिक्षा मागणाऱ्या मुलांची माहिती दिली होती.  यापैकी काही जणांची सुटका झाली असून उर्वरित मुलांच्या सुटकेसाठी पोलीस आणि संस्था कार्यरत आहे, असे ‘प्रथम’चे मुंबई विभागाचे कार्यक्रम प्रमुख नवनाथ कांबळे यांनी सांगितले.

बेपत्ता/अपहृत मुले

२०११ ते २०१८ पर्यंत

* मुले ८ हजार ०७८

* मुली १२ हजार २०९

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत सापडलेली मुले

२० फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंत

* मुले- १८

* मुली- ३०

* एकूण- ४८