१५ दिवसांत तीन हजारांनी वाढ; करोनाबाधित वाढल्याचा परिणाम

मुंबई : मुंबईतील रुग्णसंख्या जशी वाढत आहे, तसेच प्रतिबंधित इमारतींची संख्याही वाढू लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांतच प्रतिबंधित इमारतींची संख्या तीन हजाराने वाढली आहे, तर मुंबईत सध्या तब्बल साडेनऊ हजार इमारती टाळेबंद प्रतिबंधित आहेत.

सुरुवातीच्या काळात इमारतीत एखादा रुग्ण सापडला तरी संपूर्ण इमारत प्रतिबंधित केली जात होती. याला मोठय़ा प्रमाणावर विरोध होऊ लागल्यानंतर हे निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे ज्या मजल्यावर रुग्ण आहे, तोच मजला किंवा एखादे घरच प्रतिबंधित केले जात होते. मात्र गेल्या आठवडय़ात पालिकेने पुन्हा एकदा प्रतिबंधित इमारतींबाबतच्या नियमावलीत बदल करत एखाद्या इमारतीत दहापेक्षा अधिक रुग्ण असल्यास किंवा दोन अथवा अधिक मजल्यांवर रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत टाळेबंद करण्याचे ठरविले. त्यामुळे संपूर्ण इमारती टाळेबंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑगस्टमध्ये रुग्णवाढीचा दर जसा कमी झाला, तसतसे प्रतिबंधित इमारतींची संख्याही कमी झाली

होती. मात्र सप्टेंबरपासून ही संख्याही वाढू लागली आहे. सध्या एकूण रुग्णांपैकी ८० टक्के इमारतीतील आहेत.

मलबार हिल, नाना चौक यांसारख्या उच्चभ्रू विभागात एखाद्या गगनचुंबी इमारतीत फक्त एकाच मजल्यावर सात-आठ रुग्ण असतील तर तिथे संपूर्ण चाळीस मजल्यांची इमारत प्रतिबंधित करण्यापेक्षा एकच मजला प्रतिबंधित करता येतो; पण तेच पाच-सहा मजल्यांवर मिळून दहा रुग्ण असतील तर संपूर्ण इमारत प्रतिबंधित करणे आवश्यक बनते, असे मत डी. विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केले.

एखाद्या इमारतीत रुग्ण असतील तर आतापर्यंत तोच मजला प्रतिबंधित केला जात होता. मात्र लोक अनेकदा गृहअलगीकरणाचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे संसर्ग इतर रहिवाशांमध्येही पसरतो. अशा परिस्थितीत संपूर्ण इमारत प्रतिबंधित नाही केली तर अन्य रहिवासी बिनधास्त बाहेर फिरत असतात. त्यामुळे संसर्ग वाढत जातो. त्यामुळे रुग्ण वाढले की इमारत प्रतिबंधित केली तर संसर्ग आटोक्यात येण्यास मदत होते.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, जी उत्तर

प्रतिबंधित इमारती

* २० सप्टेंबर   ९५२७

* १४ सप्टेंबर   ८६३७

* १ सप्टेंबर    ६२९३