आतापर्यंत अडीच लाख मुंबईकरांना बाधा; दरदिवशी १३ ते १४ बळींची नोंद

मुंबई : फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत दोन लाख ६६ हजार मुंबईकर बाधित झाले आहेत, तर गेल्या ७० दिवसांमध्ये ९५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र मृतांचा दैनंदिन दर ०.००३ टक्के  म्हणजेच प्रतिदिवशी सरासरी १३ ते १४ मृत्यू होत आहेत. दिल्लीच्या तुलनेत मुंबईतील करोना संसर्गाची स्थिती खूप बरी असल्याचा दावा पालिका प्रशासनाने के ला आहे.

फेब्रुवारीपर्यंत आटोक्यात असलेला करोनाचा संसर्ग १२

फेब्रुवारीनंतर सतत वाढतच गेला. मात्र गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील स्थिती सुधारत असल्याचे चित्र आहे. दैनंदिन रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. रुग्णवाढीचा दरही कमी होऊ लागला आहे. करोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढू लागला आहे. त्यामुळे मुंबईत तब्बल ७० दिवसांच्या या संसर्गानंतर आता थोडे आशादायक चित्र दिसू लागले आहे. मंगळवारीही दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. दिवसभरात ४७ हजार चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी सुमारे सात हजार नागरिक बाधित आढळले आहेत. त्यापैकी ८७ टक्के  रुग्णांना लक्षणे नाहीत, असेही आढळून आले आहे.  ‘माझे कु टुंब, माझी जबाबदारी’ मोहीम, तसेच ‘मी जबाबदार’ मोहीम यांच्या कडक अंमलबजावणीमुळे ही साथ आटोक्यात येत असल्याचे मत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त के ले आहे. तसेच विनामुखपट्टय़ा फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याची मोहीम कडक के ल्यामुळे या काळात २६ लाख लोकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर

पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याची प्रतिक्रिया आयुक्तांनी व्यक्त केली आहे.

वरळीतही वेगाने रुग्णवाढ ; संसर्ग थोपवण्यासाठी पालिकेचे प्रयत्न

मुंबई : गेल्या वर्षी करोनाच्या लाटेत सर्वात पहिला अतिसंक्रमित भाग बनलेला वरळी परिसर या वेळच्या दुसऱ्या लाटेत मात्र आतापर्यंत सुरक्षित होता. वरळी कोळीवाडा, बीडीडी चाळी, जनता कॉलनी, आदर्शनगर, जिजामाता नगरचा भाग असलेल्या या परिसरात गेल्या पंधरा दिवसांत रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. त्यातही वरळी कोळीवाडय़ात दर दिवशी १० ते १२ रुग्ण सापडत आहेत. मात्र पालिकेच्या यंत्रणेने हा संसर्ग वेळीच थोपवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

फेब्रुवारीपासून करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर मुंबई विशेषत: इमारतीत रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे वरळीतही हेच चित्र होते. वरळी कोळीवाडा, जनता कॉलनी या भागात एखाद दुसरा रुग्ण आढळत असे. मात्र ९ एप्रिलनंतर या भागातही मोठय़ा संख्येने रुग्ण सापडू लागले आहेत. त्यातही वरळी कोळीवाडय़ात एकाच दिवशी १० ते १२ कधी १७, १८ रुग्ण आढळू लागले आहेत. मार्चपासून वरळी कोळीवाडय़ात २३३ रुग्ण सापडले असून सध्या या भागात केवळ १४० रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापाठोपाठ आदर्शनगर, जनता कॉलनी, जिजामाता नगर येथेही रुग्ण सापडू लागले आहेत. रुग्णांची संख्या वाढत असली तरी सध्या तरी संसर्ग आटोक्यात असून धोकादायक स्थिती नाही, अशी प्रतिक्रिया ‘जी-दक्षिण’ विभागाचे साहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.

रुग्ण सापडत असले तरी एकाच वेळी मोठय़ा संख्येने बाधित सापडत नाही. केवळ कोळीवाडय़ात दैनंदिन रुग्णांची संख्या तुलनेने जास्त असली तरी त्यापैकी बहुतांशी रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. या भागात अत्यावश्यक सेवेत काम करणारे नागरिक मोठय़ा संख्येने आहेत. ते रोज कामाला जाणारे आहेत. त्यामुळे या परिसरात चाचण्यांची संख्या वाढवल्यामुळे हे रुग्ण आढळून येत आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र गेल्या वेळसारखी परिस्थिती येऊ नये म्हणून आम्ही सर्वतोपरी काळजी घेत असून लोकप्रतिनिधी, पोलीस व पालिका कर्मचाऱ्यांच्या पथकाच्या माध्यमातून ध्वनिक्षेपकावरून जनजागृती करणे, चाचण्या वाढवणे, निर्जंतुकीकरण करणे, दवाखान्यात तपासण्या करणे याचे प्रमाण वाढवले असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

वरळीतील करोनास्थिती

विभाग                   रुग्ण    उपचाराधीन      मृत्यू

वरळी कोळीवाडा       २३३       १४०              २

जनता कॉलनी           ६३         ४१               ०

आदर्श नगर             १५२         ८६               १

जिजामाता नगर        ४६         २३                ०