डिसेंबर २०१४ अखेर देशात ९७ कोटी फोनधारक असल्याचे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी (ट्राय)च्या नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
यापैकी ९४ कोटी ३९ लाख हे मोबाइलधारक आहेत. यापैकी ८३ कोटी ३० लाख मोबाइल क्रमांक सध्या चालू आहेत. सन २०१२मध्ये फोनधारकांची आकडेवारी ९६ कोटी ५५ लाखांपर्यंत पोहचली होती. पण काही कारणांमुळे ती कमी होत होती.
नोव्हेंबर २०१४मध्ये देशातील फोनधारकांची संख्या ९६ कोटी ४२ लाख इतकी होती. एका महिन्यात ही संख्या वाढून ९७ कोटींपर्यंत पोहचली आहे.
डिसेंबर २०१४ अखेर देशात ९७ कोटी नऊ लख सत्तर हजार इतके फोनधारक आहेत.
मोबाइलधारकांचा ओढा खासगी कंपन्यांच्या सेवेकडे जास्त असल्याने सरकारी बीएसएनएलला महिन्याभरात १३ लाख ग्राहकांनी रामराम ठोकल्याचे समोर आले आहे.
तर लँडलाइन फोनची संख्या नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये एक लाखांनी कमी झाल्याचे अहवालात निदर्शनास आले आहे.
महिन्याच्या कालावधीत तब्बल ३५ लाख मोबाइलधारकांनी नंबर पोर्टेबिलिटीसाठी अर्ज केल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.