मुंबई : यंदा सलग ६० तास चालणाऱ्या ९८व्या मराठी नाटय़ संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर झाली असून नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने रसिकांना विविधरंगी कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे. नाटय़ दिंडीने संमेलनाची सुरुवात होणार असून लोककला जागर, प्रात:स्वर, विविध नाटय़प्रयोग हे यंदाच्या संमेलनाचे वैशिष्टय़ ठरणार आहेत. शिवाय संमेलनादरम्यान गो. ब. देवल पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले आहेत.

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद आयोजित ९८व्या मराठी नाटय़ संमेलनाचे बिगूल वाजले असून मुलुंडच्या महाकवी कालिदास नाटय़गृहात १३ ते १५ जून दरम्यान संमेलन पार पाडणार आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार या संमेलनाच्या अध्यक्षा, तर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे स्वागताध्यक्ष असणार आहेत. संमेलनाच्या पहिल्या दिवशी दुपारी ४ वाजता नाटय़ दिंडीने संमेलनाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता उद्घाटन समारंभ आणि रात्री ९ वाजता ‘संगीत सौभद्र’ या संगीत नाटकाचा प्रयोग सादर होईल. १४ जूनच्या मध्यरात्री १२.३० वाजता ‘पंचरंगी पठ्ठेबापूराव’ आणि त्यानंतर यमुनाबाई वाईकर यांना समर्पित असणारा ‘रंगबाजी’ कार्यक्रम पार पडेल. याच दिवशी पहाटे ६ वाजता प्रात:स्वर सत्रामध्ये राहुल देशपांडे आणि आनंद भाटे यांच्या शास्त्रीय संगीताचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. पुढील सत्रांमध्ये ‘तेलेजू-बालनाटय़’, ‘जंबा बंबा बू’, ‘इतिहास गवाह है’ असे नाटय़प्रयोग आणि ‘तुका म्हणे’ ही नृत्यनाटिका पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. तर सायंकाळी ६ वाजता गो. ब. देवल पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांची मुलाखत आणि त्यांचे सादरीकरण होणार आहे. या दिवशीच्या शेवटच्या सत्रात रात्री ९ वाजता ‘संगीतबारी’ कार्यक्रम पार पडेल.

Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
mahesh manjrekar
“सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट बनवणार”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य; शिवसेना-मनसेबाबतही केलं भाष्य

संमेलनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १५ जून रोजी मध्यरात्री १२.३० वाजता लोककला जागर कार्यक्रम होणार आहे. सकाळी ६ वाजता प्रात:स्वरमध्ये मंजुषा पाटील आणि सावनी शेंडे यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होईल. त्यानंतर अनुक्रमे एकपात्री महोत्सव, ‘साडेसहा रुपयांचं काय केलंस’, ‘चित्र-विचित्र’ या एकांकिका आणि ‘शिकस्त-ए-इश्क’ या प्रायोगिक नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येईल. दुपारी तीन वाजता ‘अपूर्व मेघदूत’ या नाटय़प्रयोगानंतर सायंकाळी ५.३० वाजता खुले अधिवेशन आणि समारोपाचा कार्यक्रम पार पडेल. तसेच समारोपानंतरही रात्री ९ वाजता संगीत रंगभूमीचा प्रवास उलगडणारा ‘रंगयात्रा’ कार्यक्रम होणार आहे. तर १६ जूनच्या मध्यरात्री १२.३० वाजता ‘सुखन’ या नाटय़प्रयोगाचे सादरीकरण होईल.

संमेलनादरम्यान सादर होणाऱ्या कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.