‘९९ नॉट आऊट’ या पुस्तकाचे प्रकाशन

‘एखादी सिगारेट जशी फुप्फुसांवर परिणाम करते, तसेच विचार हे मेंदूच्या कार्यावर परिणाम करतात. कामाची मुदत संपत आल्याचे दडपण माझ्यावर असलं की, मी अधिक वेगाने चांगले काम करतो. त्यामुळे दडपण हीच माझी खरी प्रेरणा आहे,’ असे मत गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.

लेखिका सुजाता केळकर यांच्या ‘९९ नॉट आऊट’ या पुस्तकाचे प्रकाशन जावेद अख्तर यांच्या हस्ते शनिवारी नेहरू सेंटर येथे झाले. या वेळी डॉ. फारुख उडवाडिया, अभिनेत्री लारा दत्ता, सुजाता यांचे वडील तथा अर्थशास्त्रज्ञ विजय केळकर आणि टेनिसपटू महेश भूपती उपस्थित होते. ‘तीव्र तणावामुळे मेंदूची रोगप्रतिकार क्षमता कमी होते. त्यामुळे ताण नाहीसा करणे हा मन, आत्मा आणि शरीर यांना सुदृढ बनवण्याचा मार्ग आहे,’ असे सल्ला सुजाता यांनी या वेळी दिला. ‘रोगांचा अभाव म्हणजे निरोगी आयुष्य नव्हे, तर चांगले आरोग्य म्हणजे निरोगी आयुष्य,’ असे स्पष्ट करतानाच सुजाता यांनी रुग्णाचा डॉक्टरांवरील विश्वास त्याला लवकर बरे होण्यास मदत करतो, असे मत मांडले.

मन, आत्मा आणि शरीर यांच्या सुदृढतेविषयी सुजाता यांनी दहा वर्षे संशोधन केले आहे. त्यातून हाती आलेले निष्कर्ष ‘९९ नॉट आऊट’ या पुस्तकात मांडले आहेत. निरोगी जीवनशैलीमुळे आयुष्य वाढते हे सिद्ध करणारे काही अनुभवही पुस्तकात देण्यात आले आहेत. तसेच   प्रथिने, जीवनसत्त्वे आणि झोप याची निरोगी आयुष्यासाठी गरज यांविषयी माहिती दिली आहे.

सर्वात वाईट क्षणीही माणसाला आयुष्याची चांगली बाजू पाहता आली पाहिजे. हाच जगण्याचा खरा मार्ग आहे.          – जावेद अख्तर