दोन दिवसांपूर्वी मुंबईमधील रुग्णसंख्येत काही प्रमाणात घसरण झाली होती, परंतु पुन्हा एकदा प्रतिदिन रुग्णसंख्या १० हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. मुंबईतील ९,९२५ जणांना बुधवारी करोनाची बाधा झाली, तर ५४ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईतील रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून रुग्णसंख्या कमी झाल्याचे निदर्शनास आले होते. मात्र मंगळवारपासून रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. बुधवारी ९,९२५ मुंबईकर बाधित झाले असून आतापर्यंत करोनाची बाधा झालेल्या मुंबईकरांची संख्या पाच लाख ४४ हजार ९४२ वर पोहोचली आहे. मुंबईतील विविध रुग्णालयांत उपचार घेणारे ३० पुरुष आणि २४ महिलांचा बुधवारी करोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत १२ हजार १४० जणांचा मृत्यू झाला आहे.

विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे ९,२७३ मुंबईकर बुधवारी करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत चार लाख ४४ हजार २१४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ८१ टक्के इतके आहे.

मुंबईतील करोनावाढीचा दर सरासरी १.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ४० दिवसांवर आले आहे. करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी बुधवारी ५६ हजार २६६ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ४७ लाख ५५ हजार ७३३ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या गटातील ३० हजार ५४९ संशयित रुग्णांचा शोध घेण्यात पालिकेला यश आले असून त्यापैकी १,१११ संशयित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित संशयित रुग्णांना अटीसापेक्ष गृहविलगीकरणात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात आणखी ५,५६६ रुग्ण

ठाणे : जिल्ह्यात बुधवारी ५ हजार ५६६  करोनाबाधित  आढळून आले. तर ३३ जणांचा मृत्यू झाला.  मिराभार्ईंदर आणि ठाणे शहरात सर्वाधिक मृत्यू होत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ९५ हजार ६९० रुग्ण आढळून आले आहेत.

बुधवार नोंदल्या गेलेल्या रुग्णांपैकी ठाणे महापालिका क्षेत्रात १ हजार ६७७, कल्याण डोंबिवलीत १ हजार ३९०, नवी मुंबई १ हजार १०९, मिरा भाईंदर ३७२, अंबरनाथ ३५९, उल्हासनगर २४१, बदलापूर २१९, ठाणे ग्रामीण १२७ आणि भिवंडीत ७२  रुग्ण आढळून आले.  ३३ मृतांमध्ये मिरा भाईंदर सात, ठाणे सहा, नवी मुंबई पाच, कल्याण डोंबिवली चार, बदलापूर चार, अंबरनाथ तीन, ठाणे ग्रामीण दोन आणि उल्हासनगरमधील दोघांचा समावेश आहे.