पतंग पकडण्यासाठी गेलेल्या १० वर्षांच्या मुलाचा तबेल्यातील शेणाच्या खड्डय़ात पडून मृत्यू झाल्याची घटना कांदिवली परिसरात गुरूवारी घडली. दुर्वैश जाधव असे या मुलाचे नाव आहे.
दुर्वेशचे वडील बिगारी काम, तर आई घरकाम करते. दुर्वेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. कांदिवली येथील नवीन लिंक रस्ता परिसरातील लालजीपाडा भागात राहणाऱ्या आजीच्या घरी दुर्वेश संक्रातीनिमित्त आईबरोबर आला होता. येथील एसआरए इमारतीत त्याची आजी राहते. या इमारती शेजारीच ‘फाईव्ह स्टार’ नावाचा तबेला आहे. दुर्वेश याने खिडकीतून पतंग खाली पडताना पाहिला. तो पकडण्यासाठी तो धावत इमारती खाली आला. पतंग तबेल्यात पडल्याचे पाहून दुर्वेश आतमध्ये गेला.
तबेल्यामध्ये सांडपाणी आणि शेणाची घाण वाहून जाण्यासाठी मुख्य गटाराला जोडणारा सुमारे सात ते आठ फूट खोल नाला खोदण्यात आला आहे. त्यात दुर्वेश पडला. एका नागरिकाने ही घटना पाहिली. त्याने दुर्वेशला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. नजीकच्या बांधकाम स्थळावरील मजूरांनी दुर्वेशला खड्डय़ातून बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलीस ठाण्यातील पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दुर्वेशला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 15, 2021 1:13 am