घरातून दूध आणण्यासाठी सायंकाळी बाहेर पडलेल्या एका अल्पवयीन मुलीवर ओळखीच्या तरुणाने फळाच्या रसातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी डोंबिवली एमआयडीसी परिसरात घडला. या घटनेने मानसिक धक्का बसल्याने या मुलीला एमआयडीसीतील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून हा सामूहिक बलात्काराचा प्रकार आहे का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत.
दूध आणायला गेलेल्या या मुलीची एका परिचित मुलाशी भेट झाली. त्याने आपला वाढदिवस असल्याचे सांगून तिला गुंगीचे औषध मिसळलेला फळांचा रस दिला. व नंतर तिच्यावर बलात्कार केला. रात्री उशिरा ही मुलगी निपचित अवस्थेत तिच्या एमआयडीसी परिसरातील घराजवळ सापडली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिच्या पालकांनी तिला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. उपचारानंतर शुद्धीवर आलेल्या या तरुणीने आपल्यावर कार्तिक नावाच्या तरुणाने बलात्कार केल्याचे पोलिसांना सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ती शिकत असलेल्या एमआयडीसीतील महाविद्यालयात जाऊन कार्तिक नावाच्या मुलाचा शोध घेत आहेत.
दरम्यान, या घटनेविषयी समाजमाध्यमांवर येणाऱ्या चुकीच्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त शरद शेलार यांनी केले आहे.