दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती सुरू असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणखी एका मोठ्या राजकीय व्यक्तिमत्वावर चित्रपट काढण्याच्या तयारीत आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्रीपद भुषवणारे आणि भारतीय राजकारणात कामगार नेते म्हणून ओळख असलेले जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याच्या तयारीत संजय राऊत आहेत. मुंबई मिररशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली.

जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरील चित्रपटाची संहिता माझ्याकडे तयार आहे. बाळासाहेबांवरील चित्रपटाचं काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच फर्नांडिस यांच्यावरील चित्रपटाला सुरूवात करू. दरम्यान, या चित्रपटासाठी योग्य चमूची निवड करण्यास सुरूवात झाली आहे. अद्याप चित्रपटाचं नाव काय असेल हे स्पष्ट नसल्याचं राऊत म्हणाले, पण ‘बंद’ हे नाव त्यांच्या चित्रपटासाठी योग्य वाटतंय, कारण मुंबईला ‘बंद’ या शब्दाची ओळख त्यांनीच करुन दिली, असं राऊत म्हणाले. लोकांना आता फर्नांडिस यांच्या कामाचा विसर पडला असेल पण कोकण रेल्वेचं स्वप्न सत्यात उतरवण्यात जॉर्ज फर्नांडिस यांचाच सर्वात मोठा हात होता, असं राऊत म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत
बाळासाहेबांनंतर माझ्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव जर कोणा नेत्याचा होता तर ते जॉर्ज फर्नांडिस होय. हा चित्रपट म्हणजे माझ्याकडून त्यांना सन्मानार्थ दिलेली भेट ठरावी. बाळासाहेबांवर प्रखर टीका करणारे नेते म्हणूनही जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख आहे. बाळासाहेब आणि फर्नांडिस हे एकमेकांचे राजकीय शत्रू होते हे मान्य, पण पडद्यामागे ते एकमेकांचा खूप आदर करायचे. २००५ साली वाजपेयी आणि शरद पवारांसारख्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात केवळ फर्नांडिस यांनीच बाळासाहेबांचा उल्लेख बाळ असा केला होता, अशा आठवणींना राऊत यांनी उजाळा दिला.

भारतीय राजकारणात फर्नांडिस यांना कामगार नेते म्हणून ओळखतात. कामगार संघटनेचा नेता, पत्रकार, साहित्यिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला. राज्यसभा तसंच लोकसभेचे सदस्य म्हणूनही त्यांनी सेवा केली. याशिवाय केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांनी विविध खाती सांभाळली.