मुंबईतील चिंचपोकळी परिसरात एका दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. आरोही राणे असं या चिमुकलीचं नाव आहे. आरोही दुपारी इमारतीतून बेपत्ता झाली होती. यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला होता. यावेळी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर चिमुरडी मृतावस्थेत आढळली होती. काळाचौकी पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

आरोही तिसऱ्या मजल्यावर आपल्या कुटुंबीयांसोबत राहते. दुपारी खेळत असताना इमारतीतून ती बेपत्ता झाली होती. मुलगी गायब झाल्याचं लक्षात येताच कुटुंबीयांनी सगळीकडे शोधाशोध सुरु केली होती. याचवेळी व्हॉट्सअॅपवर मुलीच्या नावे एक मेसेज फिरु लागला होता ज्यामध्ये एका अज्ञात महिलेने मुलीला पळवलं असल्याचं सांगण्यात आलं होतं. तसंच पोलिसांशी संपर्क साधून माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली असता त्यांनीही शोध सुरु केला. अखेर इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मुलीचा मृतदेह आढळला. चौथ्या मजल्यावरील बाल्कनीच्या शेडवर ती मृतावस्थेत पडून होती. तिला केईएम रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पण कुटुंबीयांनी आणि इमारतीतील रहिवाशांनी मुलीच्या मृत्यूमागे संशय व्यक्त केला आहे. चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल.