पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) घोटाळाप्रकरणी बँकेच्या खातेधारकांचा संयम दिवसेंदिवस संपत चालला आहे. सुरुवातीला त्यांनी आंदोलन केलं त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची भेट घेतली. दरम्यान, काही जणांचा या धक्क्याने मृत्यूही झाला आहे. त्यानंतर आता बँकेच्या खातेधारकांनी या समस्येवर तोडग्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार, पीएमसी बँकेच्या खातेधारकांचे १५ जणांचे शिष्टमंडळ मनमोहन सिंग यांची मुंबईत भेट घेणार आहे. यावेळी ते आपली अडचण त्यांच्यासमोर मांडणार आहेत. तसेच या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती देखील करणार आहेत.

दरम्यान, या प्रकरणी दररोज वेगाने घडामोडी घडत आहेत. गुरुवारी पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी बँकेचे निलंबित माजी व्यवस्थापकीय संचालक (एमडी) जॉय थॉमस यांना मुंबईतील कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर दुसरे माजी संचालक सुरजीत सिंह अरोरा यांना २२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोरा यांना काल आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती.

तसेच याप्रकरणी यापूर्वी अटक केलेल्या माजी अध्यक्ष वरियम सिंह, एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि त्यांचे चिरंजीव सारंग यांना आर्थिक गुन्हे विभागाने बुधवारी कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या सुनावणीदरम्यान सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) या तिघांना ताब्यात देण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयात सादर केला. ईडीनेही कर्ज घोटाळयाची दखल घेत स्वतंत्रपणे तपास सुरू केला आहे.