कूपर रुग्णालयाबाहेर राजेश यादव हातात नव्याने विकत घेतलेलं पायपुसणं घेऊन उभे होते. आपल्या दोन महिन्यांच्या मुलीचा मृतदेह त्यांनी त्यात गुंडाळला होता. मंगळवारी सकाळपासून रुग्णालयात शवविच्छेदन सुरु होतं. आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह झाकण्यासाठी मला दुसरं काहीच मिळालं नाही असं सांगताना राजेश यादव यांच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. त्यांच्या दोन महिन्यांच्या मुलीचं बारसंही झालं नव्हतं. जग पाहण्याआधीच तिला या जगाचा निरोप घ्यावा लागला. अंधेरीतील कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये चिमुरीडाचाही समोवश होता.

राजेश स्वयंपाकी म्हणून कॅटरिंगमध्ये काम करतात. सोमवारी दिवसभर राजेश यादव कूपर रुग्णालय आणि सेव्हन हिल्स रुग्णालयात धावपळ करत होते. आगीतून वाचलेली त्यांची बहिण डिंपलला कूपर तर पत्नी रुक्मिणीला सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुसरीकडे ते वारंवार कोणी आपल्या मुलीला पाहिलं आहे का याची विचारणा करत होते. आगीमुळे झालेल्या धावपळीत चिमुरडी हरवली होती.

अखेर रात्री 1 वाजता स्थानिक पोलीस राजेश यांनी होली स्पिरीट रुग्णालयात घेऊन गेले. तिथे त्यांच्या मुलीचा मृतदेह ठेवण्यात आला होता. ‘त्यांनी मला सांगितलं की, एका नर्सला चौथ्या मजल्यावरील बेडवर माझ्या बाळाचा मृतदेह सापडला. ती तिथेच निपचित पडलेली होती’, असं राजेश यांनी सांगितलं. त्यांची पत्नी आणि बहिण तिथेच बेडजवळ खाली कोसळल्या होत्या. फॉरेन्सिक टीमने गुदमरल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.

‘ते तिघेही एकत्र होते. आग लागली तेव्हा मुलगी रुक्मिणीच्या हातात होती. पण तिथे इतका धूर झाला होता की ती बेशुद्द झाली असेल’, अशी माहिती राजेश यांच्या काकांनी दिली आहे. इतरांनी इमारतीतून उडी मारुन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण कदाचित हातात बाळ असल्याने दोन्ही महिलांनी हे धाडस केलं नाही. संशय आहे की, दोन्ही महिलांना वाचवताना धुरामुळे बाळ दिसलं नसावं.

रुक्मिणी आण राजेश यांचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. दोनच महिन्यांपूर्वी त्यांच्या घरी बाळाचं आगमन झालं होतं. कामगार रुग्णालयातच प्रसूती झाली होती. पण किडनी स्टोनची तक्रार असल्याने त्यांना रुग्णालयातच ठेवलं होतं. राजेश यादव रोज सकाळी आपल्या मुलीला घेऊन रुग्णालयात जात असे. तेथून कामाला गेल्यानंतर संध्याकाळी परत जाताना मुलीला घेऊन जात असे. राजेश यादव मूळचे अलाहाबादचे असून गेल्या 10 वर्षांपासून मरोळमध्ये राहत होते.

सोमवारी सकाळी 11 वाजता राजेश कामावर गेले होते. संध्याकाळी 6.30 वाजता त्यांना रुग्णालयातून तुमच्या बहिणीला आगीतून वाचवण्यात आलं असल्याची माहिती देण्यासाठी फोन आला होता. त्यांनी तात्काळ कूपर रुग्णालयात धाव घेतली. शोध घेतला असता पत्नी सेव्हन हिल्स रुग्णालयात असल्याची माहिती मिळाली.

जेव्हा रुक्मिणी शुद्धीवर आल्या तेव्हा सर्वात आधी त्यांनी आपल्या मुलीची विचारणा केली. डॉक्टरांना त्या मुलाची चौकशी करत असल्याचा गैरसमज झाला ज्यामुळे त्यांनी एका मुलीचा मृतदेह सापडला असल्याचं सांगितलं नव्हतं. सध्या रुक्मिणी यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना मंगळवारी सकाळी बाळाच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. काही तासांनी बाळाचा मृतदेह घरी नेण्यात आला.