मुंबईत एका १३ वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वडाळा येथील राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. मुलीच्या पालकांनी आत्महत्येसाठी शाळेतील एका शिक्षकाला जबाबदार ठरवलं आहे. शनिवारी शिक्षकाने अभ्यास न केल्याने मुलीला कानाखाली लगावली होती. यामुळे मुलगी नाराज होती अशी माहिती पालकांनी दिली आहे. पोलिसांनी शिक्षकाविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मुलगी सायन येथील के डी गायववाड महापालिका शाळेत सहावी इयत्तेत शिकत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुलगी गुरुवार, शुक्रवार शाळेत गेली नव्हती. शनिवारी जेव्हा ती शाळेत गेली तेव्हा तिने आपला गृहपाठ पूर्ण केलेले नव्हता’.

पोलिसांनी घरात कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याचं सांगितलं आहे. मुलीच्या पालकांनी पोलिसांना सांगितलं आहे की, ‘मुलगी शनिवारी जेव्हा घरी आली तेव्हा सारखी रडत होती. चौकशी केली असता अभ्यास पूर्ण न केल्याने आपल्याला शिक्षकाने कानाखाली मारल्याचं तिने सांगितलं. यानंतर काही वेळातच तिने आत्महत्या केली’.

दरम्यान पोलीस वर्गात नेमकं काय झालं होतं याचा शोध घेत आहेत. ‘आम्ही तक्रार दाखल करुन घेतली असून, शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.