राज्यातील महिलांवरील अत्याचारांमध्ये नोंद झालेल्या १,८४३ बलात्काराच्या गुन्ह्यांमधील २,४७२ गुन्हेगारांपैकी सर्वाधिक गुन्हागार हे नातेवाईकच असल्याचे समोर आले आहे. ‘महाराष्ट्र गुन्हेगारी २०१२’ च्या अहवालात हे उघडकीस आले आहे. मुख्य म्हणजे, यामध्ये ९० जण हे स्वत: पालक आणि २१२ हे नातेवाईक आहेत.
नातेवाईकांनीच बलात्कार करण्याच्या घटनांमध्ये २०११ च्या तुलनेत वाढ झाली असून, हे प्रमाण टक्क्यांवरून २०१२ मध्ये ११२ टक्क्यांवर वर गेले आहे.  पालकांनीच बलात्कार केल्याच्या टक्केवारीमध्येही वाढ झाली असून, त्याचे प्रमाण ६३ टक्क्यांवरून २०१२ मध्ये ९० टक्क्यांवर गेले आहे. २०१२ च्या गुन्हेगारी अहवालातील हा सर्वाधिक खळबळजनक गुन्हेगारी प्रवाह आहे.
जवळच्या नात्यातील व्यक्तींनी बलाक्तार करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे या अहवातून समोर आले आहे. पुरोगामी महाराष्ट्रासाठी हा आलेख चांगला नव्हे. आम्ही हा अहवाल राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांसमोरही मांडला असल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाल म्हणाले.
तसेच राज्यातील एकूण बलात्कारांच्या घटनांपैकी ९५.५५ टक्के प्रकरणांमध्ये गुन्हेगार आणि बलात्काराला बळी पडलेली व्यक्ती एकमेकांना ओळखत असतात. यापैकी ८८ गुन्ह्यांमध्ये प्रेमभंग झाल्यानंतर बलात्कार करण्यात आलेल्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.      
महिलांवरील अत्याचारांमध्ये नोंद झालेल्या १,८४३ बलात्काराच्या गुन्ह्यांमधील २,४७२ गुन्हेगारांपैकी, ६७५ बलाक्तार शेजा-यांमार्फत, ४३६ मित्र आणि कार्यालयीन सहकारी, ८४५ ओळखीचे परंतू कुटुंबाबाहेरील, आठ जमीनदार आणि नऊ शिक्षकांचा समावेश आहे.
हा अतिशय विकृत गुन्हा असून, जर एखादी महिला आपल्याच कुटुंबातील वडिल, भाऊ  किंवा इतर नातेवाईकांवर विश्वास ठेवू शकत नसेल तर तिने समाजामध्ये वावरायचं कसं, असं सवाल दयाल यांनी केला आहे. आपल्याला हा विषय अतिशय खोलात जाऊन समजून घ्यायला हवा आणि त्याचा एकत्रितपणे मुकाबला करायला हवा, असंही ते पुढे म्हणाले. यामध्ये सामाजिक संस्था, महिला संघटना, शाळा यांना सामावून घेऊन, एखादे संबंध कोणत्या पातळीपर्यंत न्यायला हवेत याबाबत मुलींना ज्ञान देण्याची गरज असल्याचंही दयाल म्हणाले.      
मुंबई हि राज्याची राजधानी असली तरी ती महिलांवरील अत्याचाराचेही प्रमुख केंद्र असल्याचे या अहवालवरून स्पष्ट झाले आहे. महिलांविरूध्द नोंद झालेल्या गुन्ह्यांविध्दच्या १,८५१ गुन्ह्यांपैकी जास्तीत जास्त घटना या राज्यातील महत्वाच्या शहरांध्ये नोंदवल्या गेल्या आहेत. महिलांविरूध्दच्या अत्याचारांमध्ये २०१२ च्या तुलनेत ५९१ गुन्हे अधिक नोंदले गेले असल्याचेही अहवालातून समोर आले आहे.