कोकणात ७०, तर मराठवाडय़ात ४० टक्के अधिक बरसण्याचा अंदाज; अतिवृष्टीची धास्ती

दोन वर्षे दुष्काळाने पोळून निघालेल्या महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्य़ांमध्ये या वेळी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जागतिक हवामान संस्थेची उपसंस्था असलेल्या साऊथ एशियन क्लायमेट आऊटलूक फोरम (सॅस्कॉफ) या दक्षिण आशियायी देशांच्या हवामान विभागांकडून एकत्रितपणे तयार करण्यात आलेल्या या अहवालात कोकण व प. महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा ६० ते ७० टक्के जास्त तर मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा ३० ते ४० टक्के अधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा अंदाज खरा ठरला तर राज्यात अतिवृष्टीची धास्ती आहे.

भारतासोबत श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ व म्यानमार या देशांच्या राष्ट्रीय हवामान संस्था एकत्र येऊन मान्सूनचा अभ्यास व अंदाज सादर करतात. या वेळी श्रीलंकेत पार पडलेल्या बैठकीत हवामानाचा अंदाज सादर करण्यात आला. यानुसार दक्षिण आशियाच्या पश्चिम व मध्य भागात अधिक, तर आग्नेय (म्यानमार) व पूर्व भागात सरासरीएवढय़ा पावसाची शक्यता आहे. संपूर्ण भारतात, त्यातही महाराष्ट्रासह मध्य भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल. तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक तसेच ईशान्य भागात मान्सूनचा जोर कमी असेल, अशी नोंद आहे. भारताच्या केंद्रीय वेधशाळेनेही सरासरीपेक्षा सहा टक्के अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केंद्रीय वेधशाळेचा दुसऱ्या टप्प्यातील अहवाल जूनच्या पहिल्या आठवडय़ात प्रसिद्ध केला जाईल.

  •  या अहवालानुसार कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा  ६० ते ७० टक्के अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  •  अरबी समुद्रावरून येणाऱ्या मान्सूनचा प्रभाव अधिक असेल. त्यामुळे बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांनी पाऊस मिळत असलेल्या विदर्भात या वेळी ३० ते ४० टक्के अधिक पावसाची शक्यता आहे.
  •   महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थान या भागांतही सरासरीपेक्षा ३० ते ६० टक्के अधिक पावसाचा अंदाज आहे.
  •  अल निनो, इंडियन ओशन डायपोल, हिवाळा आणि उत्तर टोकावरील बर्फाच्छादित प्रदेश, जमिनीवरील तापमानाच्या स्थिती तसेच जमिनीचे तापमान आदी मापदंडावरून हे अनुमान काढण्यात आले आहे.